स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या आघाडी आणि युतीचे गणित जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनसेचे प्रमुख रा...
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या आघाडी आणि युतीचे गणित जुळवण्याचा प्रयत्न केला जात आहे. मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकत्र आले तर काय करावं? यासाठी महायुतीकडून प्लॅब बी तयार केला जातोय. तर महाविकास आघाडीकडून महायुतीला कसे थोपवता येईल, यासाठी डावपेच आखले जात आहेत. वरिष्ठ पातळीवर बेरजेचे राजकारण केले जात असले तरी काही ठिकाणी नेतेमंडळी मात्र वेगळ्या भूमिका घेताना दिसत आहेत. असे असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत पहिली वादाची ठिणगी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. धाराशीवमध्ये काँग्रेसने यावेळची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची भूमिका घेतली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार लवकर होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशीव जिल्हा काँग्रेसची उमरगा येथे नुकताच बैठक पार पडली. या बैठकीला धाराशीव जिल्ह्याचे काँग्रेस अध्यक्ष धीरज पाटील हे उपस्थित होते. त्यांच्याच उपस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचे संकेत देण्यात आले आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांना बळकटी मिळावी तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोर्चेबांधणीसाठी ही जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली होती. याच बैठकीत एकला चलो रे चा संकेत देण्यात आला आहे.
त्यामुळे आता धाराशीवमध्ये काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्याने या भूमिकेचा वणवा अन्य जिल्ह्यांतही जातो का? तसेच ही शक्यता खरी ठरली तर राज्यभरात महाविकास आघाडीच्या घटकपक्षांत दुफळी निर्माण होणार का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. काही दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात जवळीक निर्माण झाली आहे. त्यामुळे हे दोन्ही ठाकरे बंधू लवकरच युती करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ठाकरेंचा शिवसेना पक्ष अगोदरपासूनच महाविकास आघाडीचा घटकपक्ष आहे. असे असताना ते राज ठाकरेंशी युती करायला निघाले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्ष नेमकी काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागलेले आहे. राज ठाकरेंवर हे पक्ष आक्षेप घेतील का? हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे असताना आता धाराशीवमध्ये काँग्रेसने आपली वेगळी चूल मांडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यामुळे आता भविष्यात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
COMMENTS