आज सुमारे साडेतीनशे वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यानंतर मराठी माणसाच्या धमन्यांमधील रक्त सळसळते आणि आपसूक तोंडातून "छत्...
आज सुमारे साडेतीनशे वर्षानंतरही छत्रपती शिवाजी महाराज हे नाव ऐकल्यानंतर मराठी माणसाच्या धमन्यांमधील रक्त सळसळते आणि आपसूक तोंडातून "छत्रपती शिवाजी महाराज की जय" हा जयघोष बाहेर पडतो आणि एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. या सर्वांच कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान आहेत. असीम साहस, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे आदर्श आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी शून्यातून स्वराज्य निर्माण केले, नुसतेच निर्माण करून ते थांबले नाहीत तर या स्वराज्याचे सुराज्य कसे करता येईल यासाठी देखील अहोरात्र झटत राहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व कसे बहुआयामी होते? स्वराज्याचा सर्वांगीण विकास त्यांनी कसा केला? आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जाणता राजा म्हणून असणारी ओळख याची कारणमीमांसा करणारा हा लेख आजच्या तरुण पिढीला जगण्याचा नवीन मार्ग मिळवून देईल एवढीच अपेक्षा.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख हा एक आज्ञाधारक पुत्र म्हणून आपणास पहावयास मिळतो आई-वडिलांच्या इच्छेसाठी स्वराज्य निर्मिती करताना स्वतःच्या देहाचा अग्निकुंड करून घेणारा पुत्र दुसरा होणे नाही. पिता शहाजीराजे आणि माँसाहेब जिजाऊ यांच्या प्रत्येक आज्ञेचे पालन शिवाजी महाराजांनी केले. माँसाहेब जिजाऊंचा एक शब्दही शिवाजी महाराजांनी कधी खाली पडू दिला नाही. स्वराज्य उभारणीतील तोरणा किल्ल्याच्या लढाईपासून ते अगदी राज्याभिषेकापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या निर्णयांमध्ये आपल्या मातेच्या मतांचा सन्मान त्यांनी केला. त्यांच्याशी सल्लामसलत करून निर्णय घेतले आणि माँसाहेब जिजाऊंच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांचा आदर सन्मान त्यांनी केला. पुरंदरचा तह असेल किंवा अफजलखानाचा वध असेल यांसारख्या पेचप्रसंगांमध्ये माँसाहेब जिजाऊंच्या निर्णयांचा सन्मान ठेवून महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या आज्ञाधारक पुत्राचा आदर्श आजच्या तरुण पिढीने घेतला तर त्यांच्या जीवनाचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही.
स्त्रियांचा आदर करणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी ओळख ही आपल्याला रांज्याच्या पाटलाचा न्याय निवाडा असो, हिरकणीच्या प्रसंग असो किंवा कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा प्रसंग असो यातून तर दिसतेच परंतु माँसाहेब जिजाऊंचा आदर सन्मान, त्याचप्रमाणे महाराणी सईबाई, सोयराबाई आणि इतर महाराण्यांना दिलेली वागणूक यातून त्यांच्या स्त्री-दाक्षिण्याचा परिचय येतो. सून येसूबाईंना माँसाहेबांची कट्यार देवून त्यांना कुलमुखत्यारपद देणे असेल किंवा मुलगी राणूबाई आणि इतर मुलींना दिलेले स्वातंत्र्य व अधिकार असतील यातून शिवाजी महाराजांची सुनेबद्दल व मुलीबद्दल असणारी आस्था व त्यांना दिलेले अधिकार यांचा आजच्या समाजाने आदर्श घेणे गरजेचे आहे. एक आदर्श पिता म्हणून छत्रपती संभाजी महाराजांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे आणि मुलाबद्दल तितकेच हळवे असणारे पिता देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतात. अखंड हिंदुस्थानात स्वराज्य स्थापन करण्याचे ध्येय ऊराशी बाळगणारा एक हरहुन्नरी आणि लढवय्या सेनानी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची असणारी ओळख ही अजरामर आहे. प्रत्येक लढाईचे सूक्ष्म नियोजन, गनिमी कावा आणि प्रत्येक लढाईतील स्वतंत्र वेगळी अशी युद्धनीती हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आणखी एक वैशिष्ट्य. शिवाजी महाराजांनी एक चाल आणि एक माणूस दुसऱ्यांदा कधी वापरला नाही. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, जीवा महाला, संभाजी कावजी, नेताजी पालकर हंबीरराव, बहिर्जी नाईक या आणि अशा कित्येक निष्ठावंत शिलेदारांची योग्य पारख ही छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली होती आणि अशा अनेक शिलेदारांच्या बलिदानातून त्यांच्या कर्तव्यनिष्ठतून स्वराज्य हे बुलंद होत गेलं.
शिवाजी महाराजांनी निवडलेला माणूस, त्यांची युद्धनीती आणि त्यांचे सूक्ष्म नियोजन कधीच अयशस्वी झाले नाही आणि त्यामुळेच शिवाजी महाराज हे नेहमीच अजिंक्य अपराजित राहिले. काही नसताना एवढे मोठे प्रचंड साम्राज्य निर्माण करणे हे अलौकिक कार्य फक्त शिवाजी महाराजच करू शकतात. त्यांच्याकडे पूर्वीपासूनची संपत्ती नव्हती किंवा कुठली सत्ताही नव्हती. ना त्यांच्याकडे शस्त्रसामग्री होती, ना सैन्य होते, ना घोडदळ होते. काहीच नसताना स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर, संघटन कौशल्यातून आणि उत्तम प्रशासनातून त्यांनी सर्व गोष्टी कमावल्या आणि रायगडावर ३२ मन सोन्याचे सिंहासन उभे केले. परिस्थितीची कारणे देणारा आजचा तरुण पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाची जाणीव त्यांना करून द्यावीशी वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीच इथल्या प्रत्येक माणसाच्या रक्तामध्ये आणि इथल्या मातीमध्ये स्वाभिमानाचं आणि परिस्थितीशी लढण्याचं बीज पेरून ठेवलेलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना त्यांच्या जीवनाचा आणखी एक पैलू आपल्या लक्षात येतो तो म्हणजे त्यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बहुतांश लढाया या रात्रीच्या वेळी विशेषता अमावस्येच्या रात्री असायच्या याचं कारण म्हणजे रात्रीच्या काळोखात शत्रूला हरवणे सोपे जायचे. मुहूर्त, वेळ, तारीख ह्या संकल्पना कधीच महाराजांच्या युद्धनीतीमध्ये नसायच्या. महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास १३६ पेक्षा जास्त देशांमध्ये आजही केला जातो आणि ती युद्धनीती म्हणजे गनिमी कावा. तत्कालीन नैसर्गिक परिस्थितीचा योग्य असा वापर करून घेणे हे देखील महाराजांच्या युद्धनीतीचे एक वैशिष्ट्य. रूढी परंपरा किंवा धर्म - व्यवस्थेचा पगडा यांसारख्या समाज बंधनातून रयतेला मुक्त करून, जातीभेदाला मूठ-माती देऊन रयतेच्या मनामध्ये शिवाजी महाराजांनी एक नवीन दृष्टिकोन निर्माण करून समाजाच्या मनामध्ये स्वाभिमान निर्माण केला. शिवाजी महाराजांच्या सैन्यांमध्ये सर्व जाती धर्मांची माणसं होती. धर्म माणसांसाठी आहे माणसं धर्मांसाठी नाहीत हा मूल-मंत्र छत्रपती शिवाजी महाराजांनीच आपल्याला दिलेला आहे. सिमोल्लंघन असो किंवा आरमार उभारणी असो यांसारखे धाडसी निर्णय देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतले. पोर्तुगीज, इंग्रज, डच आणि फ्रेंच यांसारख्या परकीय सत्तांचा देखील त्यांनी बिमोड केला. समुद्री मार्गावर नजर ठेवणारे प्रचंड आरमार त्यांनी निर्माण केले. बंदरे, जलदुर्ग, आणि युद्ध नवकांची निर्मिती महाराजांनी केली. तत्कालीन सर्वात जलद गतीने धावणारे जहाज महाराजांनी निर्माण केलं. जे जहाज स्वतः इंग्रजांनी महाराजांकडे विकत मागितलं होतं. भविष्यकाळातील धोके ओळखून त्यासाठी पूर्वनियोजन करणारा दूरदृष्टीचा राजा आपल्या हिंदुस्थानाला लाभला हे हिंदुस्थानाचे भाग्यच ! शिवाजी महाराज पूर्णपणे हे जाणून होते की सैन्याला लढण्यासाठी उच्च प्रतीचे शस्त्र आणि त्याचबरोबर सुरक्षा असणे गरजेचे आहे म्हणून त्यांनी स्वराज्यातच शस्त्र निर्मितीचे उद्योग निर्माण केले. शस्त्रांमध्ये अमुलाग्र बदल घडवून ती हलकी व मजबूत केली. तलवारीचे वजन कमी केले, जेणेकरून ती अति चपळाईने फिरवता येईल. तोफा, दारुगोळा यांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्मिती केली आणि निवडक शस्त्रे परमुलखातून आयात केली. लोखंड पोलादाचे कारखाने उभे केले. यातून त्यांनी रोजगार तर निर्माण केलाच परंतु स्वदेशीचे धोरण देखील राबवले.
रांजाच्या पाटलाला चौरंगा करण्याची शिक्षा फरमावताना किंवा स्वतःच्या पुत्राचा न्यायनिवाडा करताना देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी मागेपुढे पाहिले नाही. स्वराज्याचा युवराज असो किंवा खुद्द राजा, न्याय सर्वांना एकच, अशा भाषेत न्याय करणारा एक न्यायप्रिय शासक अशी महाराजांची ओळख देखील तीतकीच महत्त्वाची.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रमुख ओळख म्हणजे रयतेचा राजा. सामान्य प्रजेसाठी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे जणु दैवत. कितीही दुष्काळ पडला तरी रायगडावर पाणी कधीही संपायचं नाही आणि प्रसंगी रायगडावरून रयतेला पाणीपुरवठा केला जायचा. महाराजांच्या स्वराज्यात शेतकऱ्यांनी कधीही आत्महत्या केली नाही. छत्रपतींच्या स्वराज्यात शेतकरी हित जोपासले जायचे. शेतसारा माफ केला जायचा. शेतकऱ्याला बी बियाणे, अवजारे, बैल जोडी हे सर्व काही स्वराज्यातून दिलं जायचं. एवढेच नव्हे तर शेतकऱ्याला कर्जही दिलं जायचं. कर्ज फेडता आलं नाही तर प्रसंगी कर्ज माफ केलं जायचं. भूमिहीन शेतकऱ्याला शेतजमिनी किंवा वतन दिलं जायचं. शेतजमीन नसणाऱ्यांना स्वराज्याच्या विविध कामांमध्ये काम दिलं जायचं. अनेकांना सैन्यामध्ये सामील करून घेतलं गेलं. छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, गोरगरिबांचे कैवारी होते. सर्वांस पोटास लावणे हेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे धोरण होते. पोटाची खळगी भरली तरच पाठीचा कणा ताठ राहतो आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आधी सर्वांच्या हाताला काम दिलं आणि म्हणून रयत स्वराज्यासाठी उभी राहिली, हे हिंदवी स्वराज्य उभे राहिले. रयत सुखी तर राजा सुखी हा जणू स्वराज्याचा मूलमंत्रच होता. दुष्काळ निवारण, पाणीपुरवठा योजना यांसारख्या महाराजांच्या संकल्पना आजही देशाला मार्गदर्शक ठरतात. शिवाजी महाराज हे ज्याप्रमाणे एक कुशल प्रशासक होते त्याचप्रमाणे एक उच्च दर्जाचे अभियंते देखील होते. महाराजांच्या काळात बांधलेले गड किल्ले आज साडेतीनशे वर्षानंतर देखील त्याच दिमाखात उभे आहेत, हे याचेच प्रमाण आहे. प्रत्येक किल्ल्यासाठी तटबंदी, दारुगोळा, धान्याची कोठारे, पिण्याचे पाणी सांडपाण्याचे नियोजन हे आपल्याला प्रत्येक किल्ल्याचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते. स्वराज्याची राजधानी रायगड आणि या रायगडाची रचना लक्षात घेतली तर शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि त्यांच्या उत्तम अभियंता असल्याचा परिचय आपल्याला सहज येतो. किल्ले बांधणीतील महाराजांचे वेगवेगळे प्रयोग, किल्ल्यांचे दरवाजे आणि मार्ग, वेळोवेळी केली जाणारी किल्ल्यांची डागडूजी, यांसारख्या गोष्टींना महाराजांनी प्राधान्य दिले. फक्त गडकोटच नाहीत तर विविध जलदुर्ग उभारून शिवाजी महाराजांनी समुद्रावर देखील सत्ता निर्माण केली. जगाच्या पाठीवर एवढ्या कमी कालावधीत कोणत्याच राजाने एवढे किल्ले बांधले नाहीत.
शिवाजी महाराजांनी केवळ गड किल्ले उभारले नाहीत, तर इथल्या माणसांचं, जाती-धर्मांच आणि इथल्या समाजाचं देखील सोशल इंजिनिअरिंग केलं. भिन्न जातीत विभागलेल्या सर्वांना सैन्यात भरती केलं आणि त्यांना मावळा या एकाच जातीत सामावून घेतलं. बहुजनांच्या सुखासाठी अहोरात्र झटणारा धर्मनिरपेक्ष राजा हा एकमेव माझा छत्रपती शिवाजी राजा. सर्वांवर जाती-धर्माचा मारलेला शिक्का संपवला जायचा आणि त्यांना मावळा अशी एकच ओळख स्वराज्यामध्ये मिळायची. धर्मांतरासारखा मोठा निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. हिंदू धर्मात बाहेर जाण्याची वाट होती परंतु पुन्हा आत येण्याची वाट मात्र बंद होती. लोकांना नाईलाजाने धर्मांतर करावं लागत असे परंतु त्यांना पुन्हा स्वधर्मात आणण्याचा मात्र इलाज नव्हता. शिवाजी महाराजांनी नेताजी पालकर आणि बजाजीराजे निंबाळकर यांना धर्मातील लोकांचा विरोध डावलून परत विधिवत आपल्या धर्मात घेतले, परंतु यांच्याशी सोयरीक कोण करणार ? त्यांना पूर्वीचा सामाजिक दर्जा कसा मिळवून देणार ? म्हणून महाराजांनी आपली एक मुलगी महादजी निंबाळकर तर दुसरी मुलगी नेताजी पालकरांचा पुतण्या जानोजी पालकर यांना दिली. समाजाला उब मिळावी म्हणून स्वतःच्या कुटुंबाची होळी करणारा शिवाजी महाराजांसारखा दृष्टा राजा दुसरा होणे नाही. सर्वधर्मसहिष्णुता ही महाराजांची आपल्याला मिळालेली शिकवण आहे. महाराजांच्या सैन्यात सर्व जाती धर्मातली माणसं होती. ज्यांनी जातिव्यवस्थेच्या जाचामुळे खूप सोसलं, पिढ्यानपिढ्या सोसलं, त्यांना चांगली संधी देऊन सर्वात जास्त पगार देऊन महाराजांनी त्यांच्या विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा प्रयत्न देखील केला. जिथे माणसांना जातीचा आधार घेऊन संधीच नाकारली जात होती, तिथे जातीच्याच जोरावर त्यांना कर्तुत्व करण्याची संधी महाराजांनी निर्माण करून दिली. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सामील झालेल्या प्रत्येकाच्या अंगी असलेले कौशल्य ओळखून त्यांच्या कौशल्याप्रमाणे त्यांना जबाबदारी वाटून दिली. युद्धात पटाईत असणाऱ्यांना त्यांनी स्वराज्याचे शिलेदार केले. उत्तम सोंग आणणाऱ्यांना गुप्तहेर केले. उत्तम लोहार काम करणाऱ्यांना हत्यार निर्मितीची जबाबदारी दिली. उत्तम स्वयंपाक बनविणाऱ्यांना त्यांनी खानसामा बनविले. छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळ हे सर्वश्रुत आहे. शिवाजी महाराजांनी पद निर्मिती केली कारण ते जाणून होते की जबाबदारी बरोबर जर पद बहाल केलं तर पद धारण करणारा त्या जबाबदारीचे ओझे आनंदाने आणि मोठ्या निष्ठेने पार पाडतो.
कोणतेही राज्य उभं करणं म्हणजे फक्त दगड मातीचे किल्ले उभे करणं, सैन्य जमवणं एवढचं नसतं, तर राज्य निर्माण करणं आणि ते राखणं यासाठी लागतो तो पैसा आणि पैसा उभा करण्यासाठी उभी करावी लागते ती व्यवस्था आणि त्याच व्यवस्थेला म्हणतात अर्थव्यवस्था. महाराजांनी दुर्गम मावळ प्रांतात एक नवीन अर्थव्यवस्था उभी केली आणि २७ वर्षे संघर्ष करून देखील ही अर्थव्यवस्था खुद्द आलमगीर औरंगजेबाला मोडीत काढता आली नाही. महाराजांनी घाटाच्या तोंडावर चौकी, घाटात जकात नाका, घाटावर किल्ला आणि घाटाच्या शेवटी बाजारपेठा वसविल्या. व्यापारातून जकात आणि जकातीतून अर्थव्यवस्थेची सुरक्षा झोकात, असा क्रम महाराजांनी बसविला. व्यापाराला संरक्षण नसेल तर अर्थव्यवस्था उभी राहणार नाही हे महाराज ओळखून होते. महाराजांच्या या अर्थव्यवस्थेच्या गणितावरून ते एक अर्थतज्ञ होते याची कल्पना आल्याशिवाय राहत नाही. आणि हेच शिवाजी महाराजांच्या अजिंक्य होण्यामागील महत्त्वाचे कारण आहे. सर्व जाती जमातीच्या युवकांना स्वराज्याचे शिलेदार त्यांनी बनवले. कोणत्याही पशुपक्षाचा बळी न देता स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा पहिला राजा म्हणून त्यांनी सर्व मावळ्यांचा विश्वास संपादन केला. उत्तम संघटन कौशल्याने स्वराज्याचा पाया रचला. आज साडेतीनशे वर्षानंतर देखील महाराजांचे व्यवस्थापन हा एक संशोधनाचा विषय आहे, आणि म्हणूनच शिवाजी महाराजांना मॅनेजमेंट गुरु असेही संबोधले जाते.
शिवाजी महाराजांबद्दल जेम्स डग्लस हा ब्रिटिश प्रवासी म्हणतो कुठल्याही आणीबाणीच्या वेळी सजग राहून शिवरायांनी त्याला तोंड दिले. महाराजांनी आपल्या जादुई स्पर्शाने आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्वाने त्यांच्या गरीब, आज्ञाधारक, दैववादी जनतेला अलौकिक कृत्ये करण्यास प्रेरित केले. ही जनता सर्वोत्तम सैनिक, पक्के सरदार, कुशल राजनीतीने विशारद झाली. जिने शेकडो युद्धे जिंकलेल्या मुघलांचा सामना केला.
जे स्वॉट म्हणतात शिवाजीराजे एक योद्धा म्हणून असामान्य होते, राज्यकर्ता म्हणून निपुण होते तर सद्गुणी लोकांचे मित्र होते. त्यांनी हुशारीने आपली धोरणे आखली, तर दृढतेने ती अमलात आणली. कोणीही कधीही त्यांच्या ध्येयाबद्दल अवगत नसे तर प्रत्येक जण त्या ध्येयाच्या पुर्तीबद्दल अवगत असे.
ॲबी कॅरी हा १६७२ ते १६७४ दरम्यान भारत भ्रमंतीवर आलेला प्रवासी आपल्या नोंदीमध्ये म्हणतो शिवाजी राजे पूर्वेने पाहिलेल्या सर्वोत्तम योद्ध्यांपैकी एक आहेत.
रॉबर्ट ओर्मी हा ब्रिटिश इतिहास अभ्यासक म्हणतो शिवाजी महाराजांकडे एका यशस्वी सेनापतीचे सर्व गुण होते. सैन्याचा प्रमुख म्हणून त्यांनी जितके जमिनीवर अंतर पार केले तितके दुसऱ्या कुठल्याही सेनापतीने केले नसेल.
डॉ. जॉन एफ.जी. कार्अरी
(सन १६९५ ) म्हणतात हे शिवाजीराजे इतके बलाढ्य आहेत की ते एकाच वेळी प्रचंड मुघलांबरोबरही लढतात आणि पोर्तुगीजांबरोबरही लढतात. ते रणांगणावर ५० हजार घोडे आणतात आणि त्याहूनही जास्त पायदळ आणतात. त्यांचे सैनिक अतिशय थोड्या अन्नावर दिवस काढतात.
शिवाजी महाराजांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचं विश्लेषण करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. त्यांच्यासारखा व्यक्ती ना कधी जन्माला आला ना पुन्हा कधीच जन्माला येईल, आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज हे एक असाधारण व्यक्तिमत्व ठरतात. तमाम रयतेचे, मायबाप शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे राजे. आया बहिणींचे रक्षण करते. मराठी मुलखाचे सर्वतोपरी हित जपणारे. सर्व जाती धर्मांचा आदर आणि रक्षण करणारे. अन्यायाचे कर्दनकाळ आणि आईच्या शब्दाचे पालन करणारे. शत्रूलाही आदर वाटावा असे छत्रपती शिवाजी महाराज हे एकमेवाद्वीतीय! छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ही मराठी माणसांसाठी अभिमानाची बाब आहेच, परंतु आंतरराष्ट्रीय किर्तीचे राजे आणि जागतिक दर्जाचे योद्धे म्हणूनही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख संपूर्ण जगामध्ये -विश्वामध्ये आहे.
निश्चयाचा महामेरू,
बहुजनांसी आधारू,
अखंड स्थितीचा निर्धारू...!
|| श्रीमंतयोगी राजा शिवछत्रपती ||
अशा या जाणत्या राजाच्या जयंतीदिनी त्यांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा ! विनम्र अभिवादन!💐🙏
- प्रा. गणेश मुक्ताजी रोकडे
(श्री शिव छत्रपती महाविद्यालय जुन्नर)
rokade.ganesh.m@gmail.com
7709036458
COMMENTS