जुन्नर, प्रतिनिधी प्रा. प्रविण ताजणे सर भागवत परंपरेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्या...
जुन्नर, प्रतिनिधी प्रा. प्रविण ताजणे सर
भागवत परंपरेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुकांनी शिवजन्मभूमी शिवनेरीहून स्वराज्य राजधानी रायगडच्या दिशेने आज प्रस्थान केले*. श्रीशिवछत्रपतींच्या पादुकांवर पवमान अभिषेक व रुद्राभिषेक झाल्यानंतर, मुख्य पुजारी सोपान दुराफे यांनी शिवाई देवीची महापूजा बांधून, महाद्वार पूजन झाल्यानंतर सोहळा रायगडाच्या दिशेने प्रतिकात्मक १ हजार पावले चालून पुढे वाहनाने मार्गस्थ झाला.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजाभिषेकाच्या ३५१ व्या वर्धापन वर्षात शिवनेरीहून निघालेल्या शिवरायांच्या या पादुका आज मंचर, खेड, चाकण, वढू बुद्रुक मार्गे श्रीशंभुराजांच्या जन्मभूमी असलेल्या सासवड परिसरात पहिला विसावा घेतील*. देशात पहलगाम हल्ला पार्श्वभूमीवर होवू घातलेल्या युद्ध संकटानंतर पुन्हा एकदा निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणात राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्साहाने आलेले शिवभक्त शिवाई देवीच्या चरणांशी विसावलेल्या पादुका घेऊन, प्रस्थान पूजा करुन नारायणगाव मार्गे तालुक्यातून पुढे गेले. श्रीशिवछत्रपती पालखी सोहळ्याचे समन्वयक डॉ. संदीप महिंद गुरुजी याप्रसंगी बोलताना म्हणाले, *कोरोनाचे बिकट संकट असतानाही आपल्या नियमित प्रथा-परंपरा जपताना २०२० व २०२१ लाही श्रीशिवरायांचा पालखी सोहळा रायगडाहून पायीच पंढरपूरला विठुरायाच्या भेटीस गेला होता. आषाढी वारीत आपली पायी चालण्याची परंपरा प्रतिकूलतेतही अखंडितपणे जपलेला हा सोहळा आता कात टाकून नव्या जोमाने, मोठ्या उत्साहात पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झालाय.
आषाढी वारीच्या निमित्ताने भक्तिसागरात सामील होण्यासाठी निघालेल्या या शक्तिपरंपरेतील शिवरायांच्या पादुका दरवर्षी शिवनेरी, संग्रामदुर्ग, वढू बुद्रुक, मल्हारगड, पुरंदर, रायरेश्वर असा प्रवास करून रायगडला जातात. तेथून 'नाम घेता वाट चाली l यज्ञ पाऊला पाऊली l' या भावाने पायी वाटचाल करत पंढरपूरची आषाढी वारी पूर्ण केल्यानंतर पुढील साडे दहा महिन्यांच्या कायम वास्तव्यासाठी या पादुका शिवजन्मभूमीत परत येत असतात. *शिवछत्रपतींच्या पादुकांच्या पालखी सोहळ्याचे हे यंदाचे ११ वे वर्ष तर परंपरेचे ३१ वे वर्ष आहे.*
शिवाई देवीच्या चरणांशी असलेल्या शिवछत्रपतींच्या पादुका घेऊन जाण्याची सेवेची संधी यावर्षी सचिन ढोमसे, गोरख जांभळे, रवींद्र सोनवणे, रोशन कदम, विनायक जांभळे, संजय बोळीज, रामनाथ ढोमसे यांच्या गटाला मिळाली आहे.
सोहळ्यास यशस्वी करण्यासाठी स्थानिक पातळीवर गौरीशंकर प्रतिष्ठानचे संदीप ताजणे, गोरक्षक शिवराज संगनाळे, लंबोदर प्रतिष्ठानचे मयूर मेहेर, सौरभ तोडकर, हाय स्पीड अभ्यासिकेचे अनिकेत कुटे, ऋशाल आमले यांनी सक्रीय सहभाग घेत परिश्रम घेतले. तर आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री. जंगले, श्री. दाभाडे तसेच शिवाई देवीचे पुजारी सोपानजी दुराफे, जुन्नर पोलीस ठाण्याचे श्री. लोहकरे, विनोद पवार, अमोल शिंदे, उपवनसंरक्षक श्री. अमोल सातपुते, प्रदीप चव्हाण आदि सर्व शासकीय व स्थानिक मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि कुसूर ग्रामस्थ आदींचे सहकार्य लाभले.
COMMENTS