मुंबई : ज्या कुटुंबातील महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी...
मुंबई : ज्या कुटुंबातील महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे.
या योजनेंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये जमा होतात. गेल्या वर्षी जुलैपासून या योजनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली. आतापर्यंत एकूण 9 हफ्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत. मात्र दुसरीकडे या योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या आहेत. या अर्थसंकल्पात या योजनेबाबत मोठी घोषणा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काहीही झाले नसल्याने या लाडक्या बहिणी थोड्या नाराज झाल्या. दरम्यान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणींना निराश करणार नाही, याची खात्री देत आहेत. (ladki bahin yojana when will the beneficiary women get rs 2100 ajit pawar gave important information)
सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी विधानसभेत केले. या खुलाशामुळे योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना 2100 रुपयांच्या मदतीसाठी अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे.
विधानसभेत 2025-26 च्या अर्थसंकल्पातील वित्त, नियोजन, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. तत्पूर्वी झालेल्या चर्चेला उत्तर देताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव अनुदान देण्याच्या मागणीवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. सध्या आम्ही लाडक्या बहिणींना कबूल केल्याप्रमाणे मदत देत आहोत. त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली की आम्ही वाढीव मदत देऊ, असे त्यांनी सांगितले.
लाडक्या बहिणीला 2100 रुपये देण्याच आम्ही नाही म्हटलेलं नाही, आर्थिक परिस्थिती पाहून आम्ही घोषणा करू, सर्व सोंगं करता येतात, मात्र पैशांचे सोंग करता येत नाही. आमची परिस्थिती सुधारली की आम्ही 2100 रुपये देऊ असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच शेतकरी कर्ज माफी संदर्भात माहिती गोळा करण्याचं काम सुरू आहे, असंही त्यांनी यावेळी म्हटलं.
COMMENTS