सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर ) दोन हजार दोनशे वर्षांपूर्वीच्या सातवाहन काळातही पर्यावरण - वृक्ष संवर्धन किती महत्त्वाचे होते . याची प्र...
सहसंपादक:- प्रा.प्रविण ताजणे ( सर )
दोन हजार दोनशे वर्षांपूर्वीच्या सातवाहन काळातही पर्यावरण - वृक्ष संवर्धन किती महत्त्वाचे होते . याची प्रचिती देणारी उदाहरणे जुन्नरच्या सातवाहन काळातील बाजारपेठ व्यावहारातील नाणी, शिलालेख, शिल्पातून उजेडात आल्याची माहिती जुन्नरचे प्राचीन इतिहास अभ्यासक नाणी संग्रहकार बापूजी ताम्हाणे यांनी सांगितले.
ताम्हाणे म्हणाले की , सातवाहन कालीन जुन्नरच्या बाजारपेठेतील व्यवहारात येणारी प्रत्येक सातवाहन नगरातील साम्राज्याची नाणी ही पर्यावरण - वृक्ष संवर्धनाचा संदेश देण्याची कामे करत असत. विशेष: म्हणजे जुन्नर मधील सातवाहनकालीन नाण्यांपैकी काहींवर सिंह, वृक्ष तर काही नगरातील नाण्यांवर हत्ती, वृक्षाचे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेते . जुन्नर मधील सातवाहन काळातील सिंह छापाच्या नाण्यावर पानाचा वृक्ष दाखवण्यात आला असून त्यातून जुन्नर परिसरातील वृक्षाविषयी संदेश देण्याचे काम नाण्यातून केल्याचे दिसून येते. काही नाण्यावर औषधी वृक्षाचे उल्लेख प्राचीन नाण्यावरील चित्राद्वारे कळते.
सातवाहन काळातील जुन्नरच्या बाजारपेठ मधील व्यवहारात येणाऱ्या दुर्मिळ नाण्यावर नदी, डोंगर, पक्षी, प्राणी, वृक्ष, सूर्य, चंद्र इत्यादी चिन्ह पर्यावरण संदर्भातील पाहवयास मिळतात. दोन हजार दोनशे वर्षापूर्वी पर्यावरण - वृक्ष संवर्धनाची जनजागृती ही सातवाहन राजघराण्यातील नाण्याच्या माध्यमातून सहज दिसून येते. लोकांना झाडाचे महत्त्व समजावे यासाठी सातवाहनांच्या नाण्यांवर पर्यावरणाच्या विविध चिन्हांचा वापर केलेला दिसून येतो .
जुन्नर जवळील मानमोडी डोंगरातील अंबा - अंबिका लेणी गट सुमूहातील २६ क्रमांक चैत्यगृहातील दर्शनी भागातील गवाक्षाच्या वरील डाव्या बाजूला दोन ब्रह्मी लिपीतील शिलालेख वृक्ष संवर्धनाचे महत्त्व सांगणारे आहे. जांभूळ, करंज, आंबा, ताड, शाल, वड, पिंपळ अशी देशी औषधी झाडे लावण्यासाठी जुन्नरच्या आजूबाजूच्या गावातील स्थानिक शेतकरी व्यक्तींनी आपल्या जमिनीत वृक्ष लागवडीसाठी बुद्ध भिक्षू संघास त्यांच्या चरितार्थासाठी जमिनी त्यातून येणारे उत्पन्न मिळवण्यासाठी दान दिल्याचे उल्लेख आढळतात.
भूत लेणी क्रमांक ४० च्या चैत्यगृहावरील कमानीच्या उजव्या बाजूला पिंपळ वृक्ष कोरलेला असून त्या वृक्षाला माळाने सजवलेलेआहे. लेण्याद्रीच्या पूर्वेकडील चैत्यगृहातील गवक्षाच्या डाव्या बाजूच्या भीतीवर मोठ्या कमानीत पिंपळ वृक्ष कुंडीत कोरलेला आहे. राजा नहपान याने ५००० झाडे दान केल्याचा उल्लेख नाशिक येथील शिलालेखातून आढळतो.
दोन हजार दोनशे वर्षांपूर्वी पर्यावरण - वृक्ष संवर्धनाचे महत्त्व किती होते हे त्या काळातील नाणी, शिलालेख, शिल्पावरून कळते. सातवाहन राजघराण्यातील नाण्यांवर पर्यावरण वृक्ष संवर्धनाचे संदेश देण्याचे काम केल्याचे दिसून आल्याचे बापूजी तांम्हाणे यांनी सांगितले.
COMMENTS