सहसंपादक-प्रा. प्रविण ताजणे ४२ दिवसांच्या खडतर प्रवासानंतर शिवरायांचा पालखी सोहळा जन्मभूमीत दाखल भागवत परंपरेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्वाच...
सहसंपादक-प्रा. प्रविण ताजणे
४२ दिवसांच्या खडतर प्रवासानंतर शिवरायांचा पालखी सोहळा जन्मभूमीत दाखल
भागवत परंपरेच्या दृष्टीने आत्यंतिक महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होण्यासाठी गेलेल्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पादुका आज शिवजन्मभूमी शिवनेरीवर परतल्या. श्रीशिवछत्रपतींच्या पादुकांवर स्वस्थान पूजेचा पवमान अभिषेक व रुद्राभिषेक झाल्यानंतर, मुख्य पुजारी सोपान दुराफे यांनी शिवाई देवीची महापूजा बांधल्यानंतर महाआरतीने यावर्षीच्या शिवरायांच्या पालखी सोहळ्याची सांगता झाली.
ज्येष्ठ शुद्ध एकादशीस शिवनेरीहून निघालेल्या शिवरायांच्या पादुका दुर्ग पुरंदरी शंभुराजांचा जन्मोत्सव सोहळा पार पाडून राजाभिषेक महोत्सवासाठी रायगडला पोहोचल्या होत्या. तेथून तब्बल २३ दिवसांचा पायी प्रवास करत आषाढ शुद्ध दशमीस भूवैकुंठ पंढरीस पोहोचल्या. मार्गात सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील अत्यंत बिकट वाटेचा आधार धबधबा उभा चढून हा सोहळा रायगड जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करता झाला होता तर सोलापूर जिल्ह्यात प्रवेशताना सोहळ्याने नीरा नदीचे पात्र पोहून पार केले होते.
श्रीशिवछत्रपती पालखी सोहळ्याचे समन्वयक डॉ. संदीप महिंद गुरुजी सोहळा समारोप प्रसंगी बोलताना म्हणाले, कोरोनाचे महामारीचे संकट असतानाही आपल्या नियमित प्रथा-परंपरा जपताना गेली दोन्हीं वर्षी शिवरायांचा पालखी सोहळा रायगडाहून पायीच पंढरपूरला विठुरायाच्या भेटीस गेला होता. प्रतिकूलतेत हाहाकार आणि अनुकूलतेत काहीसा स्वैराचार, हे अजिबातच योग्य नसल्याने साऱ्याच वारकऱ्यांनी वारीच्या काळात आणि घरी परतल्यानंतरही बोध घेऊन शासनाच्या आरोग्यविषयक सल्ल्यांना व्यावहारिक जीवनात उतरविण्याचा आग्रह शिवरायांच्या सोहळ्याने यावर्षी पूर्ण वारीत केला होता.
गुरुपौर्णिमेस आषाढी वारी पूर्ण झाल्यानंतर शिवरायांच्या पादुकांचा स्वराज्य कार्यातील आपल्या जुन्या सहकाऱ्यांना भेटविणारा कुरुंदवाड, नेबापूर, पावनखिंड, नेसरी, कापशी, वडगाव, तळबीड, सातारा, प्रतापगड, उमरठ असा मित्रभेटीचा प्रवास पार पडला. रायगडावर वारी पोहचविल्यानंतर आपल्या पहिल्या राजधानी म्हणून वसलेल्या तोरणा, राजगड व लाल महालास भेट देऊन, १२ मावळांच्या क्षेत्र प्रवासानंतर पुढील अकरा महिन्यांच्या कायम वास्तव्यासाठी या पादुका शिवजन्मभूमीत परत आल्या. सोहळा स्वस्थान प्रसंगी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. शिवछत्रपतींच्या पादुकांच्या पालखी सोहळ्याचे हे यंदाचे ८ वे वर्ष तर परंपरेचे २८ वे वर्ष होते.
कोरोना महामारीचे शासकीय प्रतिबंधात्मक नियम गेल्या २ वर्षांसारखे कठोर नसले तरीही, शिवाई देवीच्या चरणांशी शिवछत्रपतींच्या पादुका घेऊन जाण्याची सेवेची संधी यावर्षी सांगलीचे सुरेश बाबर, कोल्हापूरचे संकेत गायकवाड, लातूरचे कृष्णा भोसले, खेडचे मंथन गोसावी, विकास पाटील यांच्या गटाला मिळाली होती.
स्थानिक पातळीवर संदीप ताजणे, हर्षवर्धन कुर्हे, अक्षय कुटे, ऋषिकेश भुजबळ, राहुल रासने, स्वरूप पुरवंत, सागर मोरे, तेजस शिंदे, योगेश वाकचौरे यांनी सक्रीय सहभाग घेत परिश्रम घेतले. तर आवश्यक त्या परवानग्या मिळण्यासाठी पुरातत्व विभागाचे अधिकारी श्री. जंगले, श्री. मंगेश बोचरे तसेच शिवाई देवीचे पुजारी सोपानजी दुराफे, स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विकास जाधव, श्री. लोहकरे आदि सर्व शासकीय व स्थानिक मंदिर संस्थानचे विश्वस्त आणि कुसूर ग्रामस्थ आदींचे सहकार्य लाभले.
COMMENTS