पुणे: भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडून संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणारा आरोपी प्रशांत जाधव व त्याचे टोळीमधील साथीदार यांचे गुन्हेग...
पुणे: भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनकडून संघटित गुन्हेगारी करुन दहशत निर्माण करणारा आरोपी प्रशांत जाधव व त्याचे टोळीमधील साथीदार यांचे गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
यातील दाखल गुन्ह्यातील फिर्यादी हे २७/०३/२०२२ रोजी त्यांचे मित्रांसह हॉटेल प्यासा, भुमकर ब्रिज, पुणे येथे जेवण करुन हॉटेल बाहेर उभे असताना, फिर्यादी व आरोपी यांचेमध्ये बाचाबाची होवून वाद झाला होता. त्यावेळी यातील संघटीत गुन्हेगारी टोळीचा सदस्य जय निकम याने फिर्यादी यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली व संघटीत गुन्हेगारी टोळीचा प्रमुख प्रशांत जाधव याने फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तेथील स्टीलचा रॉड डोक्यात मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच त्यांचे इतर दोन टोळी सदस्यांनी फिर्यादी यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली म्हणून फिर्यादी यांचे फिर्यादीवरुन भारती विद्यापीठ पोलिस ठाणे, पुणे येथे गु.र.नं. २०४/२०२२ भादंविक ३०७,५०४, ३४ अन्वये गुन्हा दाखल आहे.
सदरचा गुन्हा हा यातील संघटीत गुन्हेगारी टोळीचा प्रमुख प्रशांत जाधव व त्याचे साथीदारांनी आपल्या संघटीत गुन्हेगारी टोळीचे सदर भागात वर्चस्व अबाधित राखण्याच्या तसेच प्रभुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने केलेला आहे. दाखल गुन्ह्याचे तपासामध्ये टोळीचा म्होरक्या १ ) प्रशांत प्रकाश जाधव (वय २१ वर्षे, रा. फ्लॅट नं. २०३, प्रतिक रेसीडेन्सी, सिध्दी विनायक सोसायटी, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे) व टोळी सदस्य २) जय पांडुरंग निकम वय (२१ वर्षे रा.फ्लॅट नं. ९०४, समर्थ प्रेस्टीज सोसायटी, विठ्ठलनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव खुर्द, पुणे) यांना अटक करण्यात आली आहे.
नमूद प्रशांत जाधव टोळीवर संघटीतपणे यापुर्वी सन २०२० पासून गंभीर स्वरुपाचे शरिराविरुध्दचे गुन्हे दाखल असुन, टोळीचा म्होरक्या प्रशांत जाधव याने प्रत्येक गुन्हयाचे वेळी सोबत वेगवेगळे साथीदार घेवून आपल्या टोळीची दहशत व वर्चस्व राखण्याकरीता तसेच स्वतःचे व टोळीचे अवैध आर्थिक फायद्याकरीता संघटीतरित्या टोळीने गंभीर स्वरुपाचे गुन्हे चढत्या क्रमाने केलेले आहेत. सदर टोळीप्रमुख व त्याचे टोळीचे सदस्य यांना गुन्हेगारी कृत्यांपासुन परावृत्त करण्याच्या उद्देशाने त्याचेवर यापुर्वी प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्यांचे गुन्हेगारी वर्तनात काही एक चांगला परिणाम झालेला नसल्याने त्यांचेवर ठोस व कडक कारवाई करणे आवश्यक होते.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, यांनी पुणे शहरातील अस्तित्वात असलेल्या गुन्हेगारी टोळयांचा बिमोड करण्यासाठी ठोस कारवाई करण्याचे पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार वरील सक्रिय गुन्हेगारी टोळीवर भारती विद्यापीठ पोलिस ठाणे येथे दाखल असणारे गुन्ह्यास मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई होणेकरिता राजेंद्र डहाळे, अप्पर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर यांना सागर पाटील, पोलिस उप-आयुक्त, परिमंडळ - ०२, पुणे शहर यांचे मार्फतीने प्रस्ताव सादर केला असता, सदर प्रस्तावाचे अवलोकन करून राजेंद्र डहाळे, अप्पर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर यांनी आरोपी नामे- प्रशांत जाधव व त्याचे इतर तीन साथीदार यांचे टोळी विरूध्द महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा, सन १९९९ (मोक्का) चे कलम ३(१)(ii).३(२).३(४) अन्वये कारवाई होणेकरीता ०६/०६/२०२२ रोजी मंजुरी दिली. सदर गुन्ह्याचा पुढील तपास श्रीमती सुषमा चव्हाण सहा पो आयुक्त, स्वारगेट विभाग पुणे शहर हे करीत आहेत.
पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पुणे आयुक्तालयाचा कार्यभार घेतल्यानंतर गुन्हेगारी नियंत्रणावर बारकाईने लक्ष देऊन शरिराविरुध्द व मालमत्तेविरुध्द गुन्हे करणारे व समाजामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार यांचे हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून, गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होईल यावर भर देण्याबाबत सर्व पोलिस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिले आहेत. त्यांचे मार्गदर्शनाखाली मोक्का अंतर्गत केलेली ही १९ वी कारवाई असून या वर्षातील ही ८२ वी कारवाई आहे.
COMMENTS