पुणेः पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील कल्याणी चौकात दोन दुचाकीमध्ये झालेल्या झालेल्या भीषण अपघातात तिघा युवकांचा मृत...
पुणेः पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील कल्याणी चौकात दोन दुचाकीमध्ये झालेल्या झालेल्या भीषण अपघातात तिघा युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
गुरुदास दत्तात्रय सुर्यवंशी, सागर गुरु नानावत व सुदानंद अनिल नानावत असे मृत्यूमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत.
पुणे-नगर महामार्गावरून २४ जून रोजी रात्रीच्या सुमारास महामार्गावरील अहमदनगर बाजूने गुरुदास सुर्यवंशी हा युवक त्याच्या ताब्यातील एम एच १२ एल जी ५५४८ या दुचाकी हून येत होता. पुणे बाजूने सदानंद नानावत व सागर नानावत हे दोघे विना नंबरच्या दुचाकीहून आले. यावेळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अपघातात तिघे युवक गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारांसाठी शिक्रापूर ग्रामीण रुग्णालय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तिघा युवकांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला आहे. या अपघातात कोरेगाव भीमा येथील सलून व्यावसायिक गुरुदास दत्तात्रय सुर्यवंशी (वय ५० वर्षे रा. दामोदर नगर कोरेगाव भीमा ता. शिरुर), सागर गुरु नानावत (वय १७ वर्षे रा. शेरेवस्ती धानोरे ता. शिरुर जि. पुणे) व सुदानंद अनिल नानावत (वय १८ वर्षे रा.सणसवाडी ता. शिरूर जि. पुणे) या तिघा युवकांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत ऋषिकेश अंबना तळके (वय २४ वर्षे रा. शिक्रापूर ता. शिरूर जि. पुणे मूळ रा. कडणी ता. शिंदगी जि. वाजापूर राज्य कर्नाटक) याने शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंके करत आहेत.
चौकात पांढरे पट्टे व ब्लिंकरची गरज...
कोरेगाव भीमासह पुणे-नगर महामार्ग रस्त्याचे सहापदरीचे काम जवळपास पूर्ण होत आल्याने वाहने वेगात जात आहेत. मात्र, रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांच्याही अपघातात जीवावर बेतत असल्याने चौकांमध्ये पांढरे पट्टे व ब्लिंकर बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
COMMENTS