लखनौ (उत्तर प्रदेश): मेरठमध्ये घडलेल्या सौरभ हत्याकांडात मुख्य आरोपी ठरलेल्या मुस्कानने आपल्या नवजात मुलीचा चेहरा प्रियकरला दाखवण्याची इच्...
लखनौ (उत्तर प्रदेश): मेरठमध्ये घडलेल्या सौरभ हत्याकांडात मुख्य आरोपी ठरलेल्या मुस्कानने आपल्या नवजात मुलीचा चेहरा प्रियकरला दाखवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यासाठी तिने कारागृह प्रशासनाकडे विशेष परवानगीची विनंती केली होती; मात्र तुरुंग नियमांनुसार अशा प्रकारची प्रत्यक्ष भेट घेण्याची तरतूद नसल्याने प्रशासनाने तिचा प्रस्ताव फेटाळून लावला.
सौरभची पत्नी मुस्कान आणि तिचा प्रियकर साहिल या दोघांनी इंदिरानगर परिसरात 3 मार्च 2025 च्या रात्री सौरभची क्रूरपणे हत्या केली होती. मृतदेहाचे तुकडे करून निळ्या ड्रममध्ये भरले आणि त्यावर सिमेंट टाकून बंद करण्यात आले. 18 मार्च रोजी पोलिसांनी हा गुन्हा उघडकीस आणला आणि दुसऱ्याच दिवशी दोन्ही आरोपींना अटक केली. मुस्कान आणि साहिल सध्या मेरठ जिल्हा कारागृहात आहेत.
मुस्कान हिने 24 नोव्हेंबर रोजी मेडिकल कॉलेजच्या वॉर्डात तिने एका मुलीला जन्म दिला आहे. तिचे नाव राधा ठेवण्यात आले आहे. सध्या आई आणि मुलगी दोघीही कारागृहातच आहेत. इतर महिला कैद्यांनीही राधाची काळजी घेतल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले आहे. मुस्कानने कारागृह प्रशासनाला विनंती केली होती की, तिची मुलगी राधा हिला साहिलला भेटू द्यावे आणि तिचा चेहरा त्याला दाखवावा. मात्र कारागृह अधीक्षक डॉ. वीरेश राज शर्मा यांनी सांगितले की, "तुरुंग नियमांनुसार अशा भेटीस परवानगी नाही." तथापि, न्यायालयीन सुनावणीदरम्यान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुस्कान मुलीला सोबत आणू शकते, आणि त्या वेळी साहिलला राधाचा चेहरा पाहता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, नियमांनुसार, नव्याने प्रसूती झालेल्या कैद्यांना सहा महिन्यांपर्यंत पॅरोल मिळू शकते. परंतु, मुस्कान हिने अशा प्रकारचा कोणताही अर्ज अद्याप दाखल केलेला नाही. तुरुंगात आल्यानंतर तिच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीने तिची भेट घेतलेली नसल्याने ती सध्या आपल्या नवजात मुलीसहच कारागृहात राहत आहे.


COMMENTS