छत्रपती संभाजीनगर: एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये एक महिला मागील सहा महिन्यांपासून राहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. संबंधित मह...
छत्रपती संभाजीनगर: एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये एक महिला मागील सहा महिन्यांपासून राहत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. संबंधित महिलेचं पाकिस्तानी आणि अफगाणिस्तान कनेक्शन समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
शिवाय, तिच्या घरात तब्बल १९ कोटी रुपयांचा चेकही सापडला आहे. त्यामुळे ही महिला राष्ट्रीय सुरक्षेला धोका असल्याचे तपास यंत्रणांकडून सांगण्यात येत आहे.
कल्पना त्र्यंबकराव भागवत असे या महिलेचे नाव असून ती IAS अधिकारी असल्याचे भासवत होती. छत्रपती संभाजीनगर शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये मागील ६ महिन्यांपासून राहत होती. पोलिसांना तिच्या मोबाइलमध्ये पाकिस्तान लष्कराचे मोबाइल नंबर, अफगाणी नेटवर्कशी चॅटिंग, तसेच हटवलेली चॅट हिस्ट्री आणि मोठे आर्थिक व्यवहार सापडले. तिच्या घराच्या झडतीत १९ कोटींचा धनादेश, संशयास्पद प्रमाणपत्रे तसेच परदेशी नंबरशी नियमित संपर्क अशा अनेक गोष्टी समोर आल्या. त्यामुळे ही महिला भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती का? असा संशय व्यक्त केला जात आहे. संबंधित महिलेला बुधवारी न्यायलयात हजर केले असता न्यायालयाने तिला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस तपासांत संबंधित महिलेचे पडेगाव परिसरात घर असल्याचे समोर आले आहे. तसेच तिचा प्रियकर अफगाणिस्तानचा असल्याचेही निदर्शनास आले आहे. तिच्या फोनमध्ये पोलिसांना पाकिस्तान, पेशावर आर्मी, अफगाण अॅम्बेसी व ११ आंतरराष्ट्रीय नंबर आढळले आहेत. एका चॅटमध्ये ‘अपना डीलर पाकिस्तान में है, मालूम है ना?’ असा उल्लेखही आढळून आला आहे. अफगाणी प्रियकर अशरफ व त्याचा पाकिस्तानी भाऊ गालिब यमाशी ती व्हॉट्सअॅप कॉलवरून संपर्कात होती.
पोलिसांना १९ कोटींचा चेक सापडला असून, त्यावर चेतन सुंदरजी भानुशाली या व्यक्तीचे नाव आहे. तिच्या खात्यातून ३२.६८ लाखांचे व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय दिल्लीत स्फोट घडायच्या काळात संबंधित महिलेने दिल्ली, मणिपूर, उदयपूर, जोधपूरचा वारंवार विमानप्रवास केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS