पुणे: पुणे शहरात एका महिलेने युवकाला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने युवकाचे अश्लील फोट...
पुणे: पुणे शहरात एका महिलेने युवकाला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिलेने युवकाचे अश्लील फोटो काढले आणि त्याच आधारे त्याला ब्लॅकमेलही करायला सुरुवात केली.
पीडित युवकाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
आरोपी महिलेविरोधात कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित महिला वकील असल्याचे भासवत होती. फिर्यादी युवकाच्या माहितीनुसार, महिलेने गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्यानंतर तिने त्याचे काही अश्लील फोटो काढून ठेवले. या फोटोंच्याच आधारे वारंवार ब्लॅकमेल करुन त्याच्याकडे पैशांची मागणी करत होती. एवढेच नव्हे, तर मागणी पूर्ण न झाल्यास खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी देत होती. मूळचा कोल्हापूरचा रहिवासी असलेल्या युवकावर तिने पुण्यात अत्याचार केला. शिवाय, कोल्हापूरला त्याच्या घरी जाऊन तिथे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. वाराणसी इथेही तिने फिर्यादी युवकाला बळजबरीने नेले आणि तिथेही अत्याचार केला, असे पीडित युवकाने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
महिला अश्लील फोटो काढून त्याला सतत मानसिक त्रास देत होती. शिवाय, त्याच्याकडे वारंवार पैसे मागत होती. हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ती सतत पैशांसाठी दबाव टाकत होती. बदनामी आणि खोट्या केसमध्ये अडकण्याच्या भितीने युवक मानसिक तणावात होता. अखेर त्याने कोथरूड पोलिसात या महिलेविरोधात तक्रार दाखल केली. पीडित युवकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. वकिलाची बतावणी करून गुंगीचे औषध पाजणे, जबरदस्तीने शारीरिक अत्याचार करणे, अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल करणे आणि धमक्या देणे अशा अनेक गंभीर आरोपांचा यात समावेश आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS