पुणे शहरातील कायम गजबजलेल्या आणि वर्दळ असलेल्या शहरातील बाजीराव रस्त्यावर मंगळवारी (ता. ४) एका अल्पवयीन मुलाचा भरदिवसा डोक्यात आणि तोंडावर...
पुणे शहरातील कायम गजबजलेल्या आणि वर्दळ असलेल्या शहरातील बाजीराव रस्त्यावर मंगळवारी (ता. ४) एका अल्पवयीन मुलाचा भरदिवसा डोक्यात आणि तोंडावर वार करून खून करण्यात आला.
ही घटना दुपारी सव्वातीनच्या सुमारास घडली. या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, तिघेही अल्पवयीन आहेत. मयंक सोमदत्त खराडे (वय १७, रा. साने गुरुजीनगर, आंबिल ओढा) असे खून झालेल्याचे युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयंक आणि त्याचा मित्र अभिजित संतोष इंगळे (वय १८, रा. दांडेकर पूल) बाजीराव रस्त्यावरील टेलिफोन भवन येथून दुचाकीने महाराणा प्रताप उद्यानाकडे येत होते. त्या वेळी मास्क लावून तोंड झाकलेले तीन आरोपी एकाच दुचाकीवरून आले. त्यांनी मयंक खराडे याच्या डोक्यात व तोंडावर शस्त्राने सपासप वार केले. भांडणात मध्यस्थी करणारा मयंकचा मित्र अभिजित याच्यावरही आरोपींनी कोयत्याने वार केले. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मयंकला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन तातडीने तपास सुरू केला.
दरम्यान, पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे तपास सुरू आहे अशी माहिती खडक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांनी दिली आहे. पुण्यातील नव्याने उदयास येणाऱ्या माया टोळीचे हे कृत्य असल्याचे बोलले जात आहे. आरोपींनी धारदार शस्त्रांचा वापर करत मयंक खराडे याचा खून केला आहे. आरोपींनी मयंक खराडेचे कोयत्याने केस छाटले होते. तसेच बोटही कापले होते. कापलेल बोट रात्यावर पडल्याचं पाहायला मिळाले.
मयंक हा मूळचा जनता वसाहत परिसरातील रहिवासी आहे. त्याची आई पुणे महापालिकेत नोकरीला असून त्यांना काही महिन्यांपूर्वी पुणे महापालिकेच्या साने गुरुजी वसाहतीत खोली मिळाली होती. त्यामुळे हे कुटुंब या वसाहतीत वास्तव्याला आले. मात्र, मयंकचा वावर जनता वसाहतीतच अधिक होता. मयंकचे मित्र जनता वसाहत येथेच असल्याने तो तिथे सतत जात असे. जनता वसाहत परिसरात गेल्या दोन वर्षांपासून गुंडगिरी वाढली असून तेथील टोळीयुद्धात गेल्या दोन वर्षांत तीन जणांचा बळी गेला. तसेच दहाहून अधिक जण जायबंदी झाले आहेत. तेथील काही गुंडांशी मयंक याची भांडणं झाली होती. त्यातून दोन दिवसांपूर्वी मयंकच्या मित्रांनी एकाला मारहाण केली होती. त्यामुळे तेथील काही जण त्याच्या मागावर होते, अशी माहिती समोर आली आहे.


COMMENTS