बंगळुरूतून असं प्रकरण समोर आलंय ज्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. एका सॉफ्टवेअर इंजिनियरची सेक्स उपचारासाठी तब्बल ४८ लाखांची फसवणूक करण्यात...
बंगळुरूतून असं प्रकरण समोर आलंय ज्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. एका सॉफ्टवेअर इंजिनियरची सेक्स उपचारासाठी तब्बल ४८ लाखांची फसवणूक करण्यात आल्याची तक्रार त्याने पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
हे प्रकरण विजयलक्ष्मी आयुर्वेदिक शॉप आणि त्याच्या मालकाशी संबंधित आहे. आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या महागड्या औषधांच्या सेवनाने त्याची किडनीही खराब झाली.
महागड्या औषधांनी खिसा झाला रिकामी
एफआयआरनुसार, पीडित एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्याने २०२३ मध्ये लग्नानंतर सेक्ससंबंधित कारणांवर उपचार सुरू केला होता. उपचारासाठी तो आधी एका मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात गेला. मात्र त्यानंतर तो रस्त्याशेजारील एका टेंटमध्ये पोहोचला. येथे 'शरीर संबंधामधील अडचणींवर तत्काळ उपचार' अशी जाहिरात लिहिली होती. टेंटमधील लोकांनी त्याला विजय गुरुजी नावाच्या एका कथित आयुर्वेदिक डॉक्टरची भेट घेण्याचा सल्ला दिला.
४८ लाखांची देवराज बुटी औषध की धोका?
गुरुजींनी त्याची तपासणी केली आणि त्याला देवराज बुटीचं आयुर्वेदिक औषध दिलं. ज्याची किमत ऐकून कोणालाही धक्का बसला. १,६०,००० रुपये प्रति ग्रॅम. यानंतर त्याला भवन बुटी ऑइल दिलं. ज्याची किंमत ७६,००० रुपये प्रति ग्रॅम होती. याशिवाय देवराज रसबुटी त्याला २,६०,००० रुपये प्रतिग्रॅमने दिली. पीडितेने सांगितलं की, पैसे केवळ कॅशमध्ये घेण्यात आले. ऑनलाइन पेमेंट घेण्यास त्याने मनाई केली. यासाठी पीडित व्यक्तीने बँकेतून २० लाखांचं लोन घेतलं आणि मित्रांकडून दहा लाख उधार घेतले. यामध्ये तरुणाचं ४८ लाखांचं नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे. एशियनेट न्यूजने यासंबंधित वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
पीडितेच्या किडनीवर परिणाम?
औषधं घेतल्यानंतर त्याच्या प्रकृतीत काहीच सुधार झाला नाही. काही महिन्यात त्याची किडनी खराब झाल्याचा दावा पीडितेने केला आहे. पीडित व्यक्तीने गुरुजींना याबाबत सवाल उपस्थित केला तर त्याला धमकी देण्यात आली, उपचार कायम ठेवण्यासाठी त्याच्यावर बळजबरी करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.


COMMENTS