अमरावती: अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला या गावात लग्नसोहळ्यात घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आनं...
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील पुसला या गावात लग्नसोहळ्यात घडलेल्या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. आनंदाच्या वातावरणात सुरू झालेला विवाहसोहळा क्षणभरात शोकांतिका ठरला.
कोतवाल म्हणून शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या अमोल गोड यांच्या विवाहाची लगबग गावात सुरू होती. घरात सनई-चौघडे गुंजत होते, नवरी वधूवस्त्रात सजून बसली होती आणि नवरदेव अमोल यांची वरातही आनंदात कार्यालयाच्या दारात दाखल झाली होती. विधीवत लग्न लागल्यानंतर सर्वांनी दोघांवर आशीर्वादांचा वर्षाव केला.
लग्नानंतर अवघ्या अर्ध्या तासात मोठा अनर्थ घडला. मंडपात सर्वांच्या नजरा नवविवाहित जोडप्याकडे असतानाच नवरदेव अमोल गोड अचानक चक्कर येऊन कोसळले. सुरुवातीला हा तात्पुरता त्रास असेल असे वाटले, मात्र काही क्षणातच परिस्थिती गंभीर झाल्याचे दिसून आले. पाहुण्यांनी तातडीने त्यांना रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी तपासणी केली असता अमोल गोड यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
अचानक घडलेल्या या घटनेने मंडपातील आनंदाचे वातावरण क्षणात विरून गेले. ज्या घरात काही वेळापूर्वी लग्नसोहळ्याची धामधूम होती, तिथे काही क्षणातच शोकाची शांतता पसरली. नववधूच्या आयुष्यातील आनंदाचा दिवस क्षणार्धात दुःखद स्वप्नात बदलला. वर-वधूच्या कुटुंबियांसह सर्व गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कर्तृत्ववान, मनमिळाऊ आणि सेवेत उत्साही असलेल्या अमोल गोड यांच्या अचानक निधनाने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पुसला गावात या घटनेने खळबळ उडाली असून, नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यातील सुंदर सुरुवातच शोकांतिकेत रुपांतरित झाली आहे. गावकऱ्यांनी या दुर्दैवी प्रसंगी गोड कुटुंबाला मोठ्या संख्येने भेट देऊन सांत्वन व्यक्त केले आहे.


COMMENTS