बीड: सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणात मारेकर्यांविरोधात ॲट्रॉसिटी तसेच पॉस्को अंतर्गत दहा ते पंधरा जणांवर...
बीड: सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणात मारेकर्यांविरोधात ॲट्रॉसिटी तसेच पॉस्को अंतर्गत दहा ते पंधरा जणांवर शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एमपीडीए अंतर्गत झालेल्या कारवाईत सतीश भोसले सध्या कारागृहात आहे. 12 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री भोसलेच्या कुटुंबातील महिलांवर जीवघेणा हल्ला झाला. या घटनेनंतर जखमी महिलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे. त्यानुसार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
सतीश उर्फ खोक्या भोसले याच्या कुटुंबावर मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात टोळक्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्यानंतर चार महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. शिरूर तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्तीमध्ये हा प्रकार घडला. या मारहाणीत सर्व महिला रक्तबंबाळ झाल्या. जखमी महिलांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत जखमींना बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक माहितीनुसार, अनेक वेळा सांगून देखील या ठिकाणी का राहता? असे म्हणत टोळक्याने सतीश भोसले याच्या कुटुंबाला जबर मारहाण केल्याची माहिती पुढे आली आहे.
दरम्यान, सतीश भोसले उर्फ खोक्या भाई हा शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडीचा रहिवासी आहे. मागील पाच वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय होता. भाजप आमदार सुरेश धस यांचा जवळचा सहकारी अशी त्याची ओळख आहे. सतीश भोसले याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. काही महिन्यांपूर्वी समाज माध्यमांवर दहशत पसरवणारे त्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. वनविभागाची कारवाई व घरात सापडलेल्या ऐवजामुळे राज्यभर खोक्याची चर्चा होती. बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या तरुणाला बॅटने बेदम मारहाण केलेल्या प्रकरणात सतीश उर्फ खोक्या भोसलेला बीड न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला आहे.
COMMENTS