शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे. स्वातंत्र्य लढ्यात संघाची भूमिका का...
शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे. स्वातंत्र्य लढ्यात संघाची भूमिका काय होती, हा मुद्दा उपस्थित करताना राऊत म्हणाले की, "स्वातंत्र्य लढामध्ये असं कोणतं महान राष्ट्रकार्य संघाने केलं होतं, हे भाजपने आणि संघावर नाणं काढणाऱ्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे."
शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर पुन्हा एकदा बोचरी टीका केली आहे. स्वातंत्र्य लढ्यात संघाची भूमिका काय होती, हा मुद्दा उपस्थित करताना राऊत म्हणाले की, "स्वातंत्र्य लढामध्ये असं कोणतं महान राष्ट्रकार्य संघाने केलं होतं, हे भाजपने आणि संघावर नाणं काढणाऱ्यांनी एकदा स्पष्ट केलं पाहिजे."
महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संघाशी जोडण्याच्या प्रयत्नावर राऊतांनी तीव्र आक्षेप नोंदवला. ते म्हणाले, "गांधी किंवा डॉक्टर आंबेडकर यांनी कधी संघाचं समर्थन केलं नव्हतं. उलट डॉक्टर आंबेडकर यांनी संघ हा विष आहे, असं स्पष्ट म्हटलं होतं." पुढे त्यांनी कमलाताई गवई यांना संघाच्या मेळाव्यात बोलावून आंबेडकरी विचारसरणी आणि संघ यांच्यात संबंध जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही केला.
दसरा मेळाव्याच्या परंपरेबद्दल बोलताना राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रात दोनच दसरा मेळावे होतात. एक नागपूरला संघाचा आणि दुसरा मुंबईत शिवसेनेचा. संघाचा मेळावा नागपूरमध्ये होतो आणि ती एक परंपरा आहे. शंभर वर्षे संघ अस्तित्वात आहे, आणि आज त्यांच्या हातात देशाची सत्ता आहे." संघाच्या प्रभावाबद्दल बोलताना त्यांनी टोला लगावला की, "संघाने प्रधानमंत्री नेमले आहेत, राज्यपाल नेमले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला सत्तेचं तेज आलं आहे." संघाच्या शस्त्रपूजनावर टिप्पणी करताना ते म्हणाले की, "त्यांच्या हातात काठ्या असतात आणि काठीच्या माध्यमातून देश रक्षणाची परंपरा त्यांनी जोपासली आहे."
याच संदर्भात राऊतांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका आठवली. ते म्हणाले, "बाळासाहेब म्हणायचे की आम्हाला AK-47 हव्या आहेत. काठ्या-लाठ्यांना तेल लावून देशाचं रक्षण होणार नाही. शिवसैनिकांच्या हातात AK-47 आली तर जम्मू-काश्मीरसह देशाच्या सीमा आम्ही सुरक्षित ठेवू, बलिदान द्यायला मागेपुढे पाहणार नाही."
संघाच्या भूमिकेवर आणखी टीका करताना राऊत म्हणाले की, "हो, संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे. त्यांचा हिंदुत्ववादी विचार आहे, याबद्दल आमच्यात शंका नाही. आमचीही एकेकाळी त्यांना सहानुभूती होती. पण राष्ट्र संकटात सापडतं तेव्हा, सत्ताधाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेणं आवश्यक असतं. मात्र संघाने तशा भूमिका कधी घेतल्या नाहीत." संजय राऊत यांच्या या टीकेमुळे संघ आणि ठाकरे गटातील मतभेद पुन्हा एकदा ठळकपणे समोर आले आहेत. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर झालेली ही टीका आगामी राजकीय घडामोडींना नवी दिशा देऊ शकते.


COMMENTS