कुर्नूल : आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात खासगी बसला झालेल्या अपघातातनंतर लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गुरुवार...
कुर्नूल : आंध्र प्रदेशातील कुर्नूल जिल्ह्यात खासगी बसला झालेल्या अपघातातनंतर लागलेल्या आगीत 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास उलिंडाकुंडा परिसरात ही दुर्घटना घडली.
या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. हैदराबादवरून बंगळुरूकडे निघालेल्या एका खासगी व्होल्वो बसमध्ये एकूण 40 प्रवासी होते. प्रवासादरम्यान बसला एका मोटरसायकलने धडक दिली आणि काही क्षणांतच बसला भीषण आग लागली. काही प्रवाशांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. परंतु, आग झपाट्याने आणि बस काही मिनिटांतच जळून खाक झाली.
मोटरसायकल बसला येऊन धडकली आणि त्या धडकेत बसच्या इंधन टाकीचा स्फोट झाला. त्यानंतर बसला प्रचंड आग लागली. घटनेनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु, त्यापूर्वीच अनेक प्रवासी बसमध्ये अडकले होते. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि अग्निशमन दलाने संयुक्तपणे बचावकार्य सुरू केले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत म्हटले आहे की, ‘कुर्नूल जिल्ह्यात घडलेल्या या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांविषयी मी अतिशय दु:ख व्यक्त करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या भावना आहेत. जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. तसेच त्यांनी जाहीर केले की, "या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री राष्ट्रीय राहत निधीतून 2 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपये मदत देण्यात येईल."
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले. "कुर्नूल जिल्ह्यातील चिन्ना टेकूर गावाजवळ झालेल्या या भीषण बस आगीच्या दुर्घटनेबद्दल ऐकून मला धक्का बसला. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या कुटुंबीयांबद्दल माझ्या मनापासून संवेदना आहेत. जखमी आणि बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश मी प्रशासनाला दिले आहेत," असे त्यांनी म्हटले आहे.


COMMENTS