गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याला पावसाने झोडपले आहे. शेतकऱ्यांचे संसार पाण्यात वाहून गेले. पिकांचे अतोनात नुकसान झाले. या पार्श्वभूमीव...
गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्याला पावसाने झोडपले आहे. शेतकऱ्यांचे संसार पाण्यात वाहून गेले. पिकांचे अतोनात नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय नेतेमंडळी पूरग्रस्त भागांची पाहणी करत आहेत.
यावरून देखील राज्यात राजकीय डाव रंगले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे पत्रकार परिषदेत म्हणाले,"सत्य तुम्ही समजून घेतलं पाहिजे. महाराष्ट्रावर जे संकट कोसळले आहे आणि आताही कोसळत आहे. या प्रकारचा तुफानी पाऊस आता सुरू आहे. सरकारने २४ तास काम केले पाहिजे. सरकार कुठे आहे? मुंबईमध्ये लोकांना भारत पाकिस्तान क्रिकेट पाहता यावे, म्हणून गृहमंत्री यांनी सुरक्षेसंदर्भात खास सूचना दिल्या आहेत. जर कोणी भारत पाकिस्तान सामना लावला असेल, रेस्टॉरंट मध्ये हॉटेलमध्ये तर त्यांना संरक्षण द्या मराठवाडा मधील शेतकऱ्यांना संरक्षण नाही. मुंबई क्रिकेट असोसिएशनची निवडणूक आहे, भारतीय जनता पक्षासह अनेक लोक त्या निवडणुकीमध्ये गुंतून पडले आहेत. मराठवाडा शेतकऱ्यांसंदर्भात निर्णय घ्यायला त्यांना वेळ नाही."
गेल्या दहा दिवसांपासून शेतकरी पाण्यात पावसात चिखलात आहेत आणि परत आज पासून पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. मुख्यमंत्री यांनी मुंबई सोडून मंत्रीमंडळाच्या प्रमुख लोकांसह व अधिकाऱ्यांसह संभाजीनगरला, लातूरला, नांदेडला जाऊन थांबणे गरजेचं होतं. लोकांना चार चार दिवस अन्न आणि पाणी मिळालेले नाही घरं वाहून गेली, निवारा नाही आणि तुम्ही मुंबईत काय करत आहात? नागपूर मध्ये काय करत आहात?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पुढे ते म्हणाले, "हा फक्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांना प्रश्न नाही, तर मंत्रिमंडळालादेखील आहे. अत्यंत कामचुकार मंत्रिमंडळ आहे. किती तुम्ही आतापर्यंत लोकांना मदत केली? कोणाला मदत केली? त्याचा हिशोब देऊ शकता का नाही? आतापर्यंत खाजगी संस्थांनी व सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी जेवढी मदत केली आहे, त्याच्या पलीकडे सरकारकडून कोणतीही मदत मिळू शकली नाही. मी आज सकाळी अनेक जिल्ह्यात बोललो आहे. काल उद्धवसाहेब जे बोलले आहेत. आमच्या शिवसेनेची लोकं मदत करत आहेत, पण त्यांना मर्यादा आहे.
"आभाळ फाटलं आहे, अशा वेळेला पूर्ण मदत ही सरकारकडून व्हायला पाहिजे. सरकार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत लागले आहे. आयपीएल कसं होणार त्या बंदोबस्ताला लागले आहे, शेतकऱ्यांचे त्यांना काही पडलं नाही. मराठवाडा असेल, अहिल्यानगरचा मोठा भाग आहे, जळगाव येथील काही भाग आहे, ठिकठिकाणी हा पाऊस सुरू आहे. कोकणात पाऊस सुरू झाला आहे. पूर्ण नुकसान झाले आहे. तुमचे मंत्री कुठे आहेत? धाराशिवचे पालकमंत्री एकदा गेले, दोन टेम्पो घेऊन आपले फोटो लावून, पण ते आता कुठे आहेत? दुष्काळग्रस्त पूरग्रस्त जिल्हे आहेत, त्याला तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करा. पालकमंत्र्यांनी त्या त्या जिल्ह्यातील त्यांनी तिथे ठाण मांडून बसलं पाहिजे. पालकमंत्री मुंबईला काय करत आहेत? कशाकरिता नेमले आहेत? अशा मंत्र्यांना बडतर्फ केले पाहिजे. हा सामाजिक राजकीय गुन्हा आहे."


COMMENTS