रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात २८ सप्टेंबर २०२५ रोजी 'रेड अलर्ट' घोषित करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्न...
रायगड जिल्हा आणि पुणे घाट परिसरात २८ सप्टेंबर २०२५ रोजी 'रेड अलर्ट' घोषित करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, छत्रपती संभाजीनगर तसेच सातारा आणि कोल्हापूर घाट परिसरात 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने दिली आहे.
'सचेत' प्रणालीद्वारे नागरिकांना सतर्कतेच्या सूचना पाठवल्या जात असून, भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्र या केंद्रीय संस्थांशी सतत संपर्क ठेवून अंदाजित हवामानाची माहिती सर्व जिल्ह्यांना उपलब्ध करून दिली जात आहे.
सोलापूर जिल्ह्यात सीना नदी वडकबाळ येथे आणि भीमा नदी टाकळी येथे इशारा पातळीच्यावर वाहत आहे. सीना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची पथके तैनात करण्यात आली आहेत.
सरकार गरज भासल्यास नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यास तयार आहे.
जामखेड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खेरी धरणातून सकाळी ९.३० वाजल्यापासून १६,७४३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर केले जात आहे.
दरडवाडी पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने जामखेड-खर्डी मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
परांडा आणि भूम तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. खबरदारी म्हणून नागरिकांचे स्थलांतर सुरू असून, मदत व बचावासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन पथकांना पुणे येथून रवाना करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील २० सर्कलमध्ये ६५ मिमी. इतक्या अतिवृष्टीची नोंद झाली असून, त्यानुसार आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्याची खबरदारी प्रशासनाने घेतली आहे.
लातूर जिल्ह्यात सरासरी ७५.३ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. अहमदपूर तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. छिलखा बॅरेज येथे चार नागरिक अडकल्याची बातमी होती. अडकलेल्या चार नागरिकांच्या सुटकेसाठी स्थानिक पथकाकडून बचावकार्य सुरू आहे. (Maharashtra Rain Alert)
सुरक्षेच्या दृष्टीने जिल्ह्यातील ६० रस्ते बंद करण्यात आले आहेत. तसेच, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक नांदेडहून लातूर-अहमदपूरकडे पाठवण्यात आले आहे.


COMMENTS