मागील दोन आठवड्यांपासून मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचे संसार अतिवृष्टीमुळे कोलमडले आहेत. जमीन खरडून गेली आहे, पिकांची न...
मागील दोन आठवड्यांपासून मराठवाड्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचे संसार अतिवृष्टीमुळे कोलमडले आहेत. जमीन खरडून गेली आहे, पिकांची नासधूस झाली आहे. शेतकऱ्यांची भेट घेऊन नुकसानीची पाहणी करण्यासाठी राज्यातील मंत्री आणि नेते बांधावर पोहोचलेले आहेत.
तसेच शेतकऱ्यांवर असलेले कर्ज सरकारने माफ करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनीदेखील सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचं सर्व काही उद्ध्वस्त झाले आहे. पिके तर गेलीच आहेत, मात्र त्यांच्या जमिनीदेखील वाहून गेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या, अशी मागणी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे. खासदार सोनवणे हे आज बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करत आहेत. त्यांनी गेवराई तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर, माजलगाव तालुक्यातील गोदावरी नदी काठच्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे. यावेळी त्यांनी गावात रस्ता नसल्याने थर्माकोलच्या चप्पूवर बसून पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे.
यावेळी खासदार सोनवणे म्हणाले की, "बीड जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवलेला आहे. जायकवाडी धरणातून बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणाला पाणी सोडले आहे. आज गोदावरी नदीच्या बाहेर तीन किलोमीटर पर्यंत पाणी आहे. या पाण्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव, परळी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील दहा ते बारा गाव असे आहेत की त्यांचा संपूर्ण संपर्क तुटला आहे. गावच्या गावं उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे ज्या लोकांच्या शेतीचे, घराचे नुकसान झाले आहेत, त्यांना तात्काळ मदत द्या, शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या. ज्या लोकांची शेतं वाहून गेली आहेत त्यांना वेगळं अनुदान द्या, पूरग्रस्त भागातील लोकांचे पुनर्वसन करा" अशी मागणी यावेळी खासदार बजरंग सोनवणे यांनी केली आहे.


COMMENTS