रत्नागिरी : एका युवतीच्या खूनप्रकरणात अटक केलेल्या दुर्वास पाटील याने आणखी दोन खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून खळबळ उडाली आहे. भक्...
रत्नागिरी : एका युवतीच्या खूनप्रकरणात अटक केलेल्या दुर्वास पाटील याने आणखी दोन खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले असून खळबळ उडाली आहे. भक्ती या युवतीचा खून केला त्यावेळी ती गरोदर होती.
त्यामुळे तिच्या गर्भातील बाळाचाही खून झाला अशी चर्चा होती. मात्र, पोस्टमार्टममध्ये ती गरोदर नसल्याचे समोर आले आहे. दुर्वास व त्याचे साथीदार पोलिसांच्या ताब्यात असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
एका खूनाचा तपास सुरू असताना दुर्वास पाटील याने एक, दोन नव्हे तर तब्बल तीन खून केल्याचे समोर आले आहे. पहिला खून सीताराम वीर (वय 50, वाटद-खंडाळा), दुसरा खून राकेश जंगम (वय 28, वाटद,खंडाळा), तर तिसरा खून भक्ती मयेकर हिचा केला आहे. दुर्वास पाटील याला अटक केल्यानंतर तो सराईत गुन्हेगारासारखा वागत असल्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला होता. वाटद खंडाळा येथील एका बेपत्ता व्यक्तीचा तपास सुरू असतानाच राकेश जंगम या बेपत्ता असलेल्या युवकाचाही खून दुर्वास यानेच केल्याच्या समोर आले. पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान त्याने खुनाची कबुली दिली आहे.
सीताराम वीर हा माझ्याशी फोनवरून अश्लील भाषेत बोलत असल्याचे प्रेयसी भक्ती हिनेच मला सांगितले होते. यामुळे आलेल्या रागातून आपण वीरला संपवले, असे दुर्वास दर्शन पाटील याने पोलिसांना सांगितले. लग्नात बाधा नको, म्हणून दुर्वास याने वायरने गळा आवळून भक्ती मयेकर हिचा खून केला. भक्ती 16 ऑगस्टपासून बेपत्ता असल्याने तिच्या भावाने रत्नागिरी पोलिस ठाण्यात बेपत्ताची तक्रार दिली होती. त्यानुसार शहर पोलिस तपास करीत असताना तिची हत्या दुर्वास याने केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याला तसेच खुनासाठी मदत करणारे त्याचे साथीदार विश्वास पवार, नीलेश भिंगार्डे यांना अटक केली आहे.
पोलिस चौकशीत दुर्वास याने सीताराम वीर याला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची कबुली दिली. तसेच वीर याच्या खुनाची माहिती राकेश जंगम याला होती. ती तो पोलिसांना देईल, अशी भीती वाटत असल्याने त्यालाही बारमध्ये ठार मारून त्याचा मृतदेह आंबा घाटात दरीत टाकल्याचे दुर्वास याने कबूल केले. या तिहेरी हत्याकांडात आतापर्यंत दुर्वास पाटील, विश्वास पवार, सुशांत नरळकर, नीलेश भिंगार्डे असे चार आरोपी असल्याचे स्पष्ट केले.
भक्ती मयेकर (वय 26, मिरजोळे) हिला मारण्याचा कट सायली बारमध्येच रचला. आंबा घाट हे निर्जन स्थळ असल्याने या ठिकाणी मृतदेह टाकल्यास सापडणार नाही अशी त्याला खात्री होती. त्याप्रमाणे भक्तीचा ही बारच्या वरती असलेल्या रूममध्ये केबलने गळा आवळून खून केला व पुरावा नष्ट करण्याचे हेतूने मृतदेह आंबाघाटात रात्रीच्या वेळी फेकून दिला. तब्बल दहा दिवसानंतर बेपत्ता असलेल्या भक्तीचा खून झाल्याचे उघड झाले. भक्तीच्या भावाने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आणि संशय निर्माण झालेल्या दुर्वास पाटील यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. त्यानंतर या सगळ्या प्रकरणांना आता वाचा फुटली आहे. त्याच्यासोबत विश्वास पवार व निलेश भिंगार्डे यांनाही अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. चौकशीत दुर्वासने एकामागोमाग एक खूनाची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे.
COMMENTS