लातूर: वाढवणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चाकूर-शेळगाव फाटा मार्गावरील तिरू नदीच्या पुलाखाली 24 ऑगस्ट रोजी एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतद...
लातूर: वाढवणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चाकूर-शेळगाव फाटा मार्गावरील तिरू नदीच्या पुलाखाली 24 ऑगस्ट रोजी एका सुटकेसमध्ये अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह पूर्णतः कुजलेल्या अवस्थेत असल्याने महिलेची ओळख पटवणे अवघड झाले.
अखेर या महिलेच्या खुनाचा उलगडा लावण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.
फरीदा खातून (वय २३, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. फरीदा खातून आणि तिचा पती जिया ऊल हक (वय ३४) उदगीर जवळील विलास साखर कारखाना परिसरात कामगार म्हणून काम करीत होते. दोघे आपल्या दोन मुलांसह राहत होते. मात्र पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून आरोपी पती जिया उल हक याने आपल्या चार साथीदाराच्या मदतीने फरीदाच्या छातीवर बसून, तोंडावर उशी दाबून खून केला. त्यानंतर फरीदाचा मृतदेह एका ट्रॉली बॅगेत ठेवून उदगीर तालुक्यातील तिरु नदीच्या पुलाजवळ फेकून दिला होता.
पत्नी फरीदा हिचे परपुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय असल्याने त्यांच्यात नेहमी भांडणं होत होते. फरीदा ही काही दिवसापूर्वीच मुलांसह जिया उल हक याच्याकडे राहण्यास आली होती. साखर कारखान्याने दिलेल्या एका खोलीत हे कुटुंब राहत होते. चारित्र्यावरील संशयावरून पती जिया उल हकने साथीदारासोबत मिळून फरीदाच्या हत्येचा कट रचला.
15 ऑगस्ट रोजी साखर कारखान्यातील कामगारांची सुट्टी असल्याने जिया उल हक याने दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घरी असताना आपले उत्तर प्रदेशातील साथीदार सज्जाद जरूल अन्सारी (वय 19 वर्ष), अरबाज जमलू अन्सारी (वय 19 वर्ष), साकीर इब्राहिम अन्सारी (वय 24 वर्ष), आजम अली सजवाल अली उर्फ गुड्डू (वय 19 वर्ष) यांना बोलावून घेतले आणि सर्वांनी मिळून फरीदाचा खून केला.
पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी जिया उल हक याने पोलिस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. याप्रकरणी लातूर पोलिस, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कसून तपास करून या गुन्ह्याचा उलगडा केला. याप्रकरणी आरोपींना न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, पुढील तपास पोलिस करीत आहेत.
COMMENTS