रायगड : अलिबाग तालुक्यातील दिवीवाडी-महाजने गावात एकाने प्रथम प्रेयसीच्या काकाची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात शिक्षा भोगून आल्यानंतर त्य...
रायगड : अलिबाग तालुक्यातील दिवीवाडी-महाजने गावात एकाने प्रथम प्रेयसीच्या काकाची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे.
अर्चना नाईक (वय ३६) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. दत्ताराम पिंगळा असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी दत्ताराम विरोधात हत्येसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हत्येची ही घटना घडल्यानंतर रेवदंडा पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आहे. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अर्चना नाईक (वय ३६) आणि आरोपी दत्ताराम पिंगळा याचे पूर्वी प्रेमसंबंध होते. दोघांना एकमेकांशी लग्नही करायचे होते. मात्र, अर्चनाच्या काकांनी या नात्याला विरोध करताना त्यांनी अर्चनाचे लग्न दुसऱ्या व्यक्तीसोबत लावून दिले होते. या रागातून दत्तारामने अर्चनाच्या काकांची हत्या केली. त्या गुन्ह्याबद्दल पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला तुरुंगवास देखील झाला.
दत्ताराम पिंगळा हा काही दिवसांपूर्वीच कारागृहातून सुटला होता. दत्ताराम अर्चनाला भेटण्यासाठी तिच्या आईच्या घरी गेला. त्याने पुन्हा अर्चनाला रिलेशनशिपमध्ये येण्याबाबत विचारणा केली. पण तिचे लग्न झाल्यामुळे या गोष्टी शक्य नव्हत्या. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. हा वाद वाढत गेल्यानंतर दत्तारामने दोरीने गळा आवळून अर्चनाची हत्या केली. ही घटना मंगळवारी उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. अर्चनाची बहीण दर्शना नाईक यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी आरोपी दत्ताराम पिंगळा याला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS