छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको भागातील एम्स हॉस्पिटलमध्ये एका नर्सचा वॉशरुममध्ये संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळब...
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहरातील हडको भागातील एम्स हॉस्पिटलमध्ये एका नर्सचा वॉशरुममध्ये संशयास्पद अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. हर्षदा पद्माकर तायडे (वय २४) असे मृत नर्सचे नाव आहे.
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्सने इंजेक्शन घेतल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. हर्षदा तायडे ही एम्स हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून काम करत होती. रविवारी दुपारी बराच वेळ ती तिच्या जागेवर दिसली नाही. तिच्या सहकाऱ्यांनी तिला फोन केला असता, तिने आपण स्वच्छतागृहात असल्याचे सांगितले. मात्र, बराच वेळ होऊनही ती परत न आल्याने तिच्या सहकाऱ्यांना शंका आली. त्यांनी जाऊन पाहिले असता, ती स्वच्छतागृहात बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.
यावेळी, तिच्याजवळ एक इंजेक्शनही सापडले. हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी तात्काळ तपासणी केली असता, इंजेक्शन घेतल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
हर्षदाच्या मृत्यूचे नेमके कारण काय, तिने स्वतःहून इंजेक्शन घेतले की आणखी काही कारण आहे, याचा तपास करण्यासाठी मृतदेह विच्छेदनासाठी घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले. सध्या या घटनेची नोंद सिडको पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.


COMMENTS