पुणे : विवाहानंतर अवघ्या दीड महिन्यात घटस्फोट झाला आहे. पसंत नसल्याचे आणि हुंडा-मानपान केला नसल्याचं कारण देऊन नववधूला घराबाहेर काढणाऱ्या ...
पुणे : विवाहानंतर अवघ्या दीड महिन्यात घटस्फोट झाला आहे. पसंत नसल्याचे आणि हुंडा-मानपान केला नसल्याचं कारण देऊन नववधूला घराबाहेर काढणाऱ्या पतीसह-सासरच्या मंडळींनी एकरकमी 45 लाख रुपये पोटगी देण्याची तयारी न्यायालयात दर्शवली.
त्यानंतर नववधूने सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे दावे मागे घेतले असल्याची घटना समोर आली आहे. महागड्या घटस्फोटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.
वर्षभरापासून न्यायालयीन लढाई लढणाऱ्या एका दाम्पत्याचा परस्पर संमतीने घटस्फोट अर्ज न्यायालयाने मंजूर केला. पत्नीच्या वकिलांनी केलेल्या समुपदेशनातून या कौटुंबिक वादात तडजोडीचा मार्ग निघाला आहे. या दाम्पत्याचा विवाह जानेवारी २०२२ मध्ये मोठ्या थाटामाटात झाला होता. नवरी सासरी गेल्यानंतर काही दिवसांतच घरात वादाचे वातावरण सुरू झाले. लग्नात हुंडा व मानपान झाले नाही. “मला तू पसंत नाहीस; घरच्यांच्या दबावाखाली मी हे लग्न केले,” असे बोलत पत्नीला सतत टोमणे मारले जात होते.
पती-पत्नीतील भांडणे चिघळल्यानंतर नवरीला सासरच्या मंडळींनी घराबाहेर काढले, असा आरोप करून तिने पती, सासू, सासरा व नणंदेविरोधात भोसरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी चौकशी करून संबंधितांवर कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला व न्यायालयात आरोपपत्र सादर केले. दोन्ही पक्षांचे समुपदेशन केल्यानंतर पतीने ४५ लाख रुपये एकरकमी पोटगी देण्यास सहमती दर्शवली. पत्नीनेही सकारात्मक प्रतिसाद देत कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप मागे घेतला. त्यानंतर आरोपींना न्यायालयाने कायदेशीररीत्या मुक्तता दिली. वाद मिटल्यानंतर दोन्ही पक्षांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने घटस्फोटाला मंजुरी दिली. वर्षभर चाललेल्या वादाला अखेर पूर्णविराम मिळाला असून, दिवसाला एक लाख रुपयांप्रमाणे हा महागड्या घटस्फोट असल्याची चर्चा आहे.


COMMENTS