महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' आणली. या योजनेच्या अंतर्गत पात्र महि...
महाराष्ट्रातील महायुती सरकारने विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' आणली. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देण्यात येतात.
या योजनेला संपूर्ण महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळाला. अत्यंत लोकप्रिय ठरलेल्या या योजनेमुळेच महायुती सरकारचा विधानसभा निवडणुकीत महाविजय झाल्याचं बोललं जात आहे. लाडकी बहीण योजनेच्या नंतर आता सरकार लाडकी सुनबाई योजना सुरू करण्याच्या विचारात असल्याचं बोललं जात आहे.
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' ही महायुती सरकारची अत्यंत लोकप्रिय आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या यशानंतर आता सरकारकडून 'लाडकी सुनबाई योजना' सुरू करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे या योजनेची घोषणा करणार असल्याचं बोललं जात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लाडकी सुनबाई योजनेची घोषणा केली जाणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभीमीवर लाडकी सुनबाई योजनेची घोषणा होणार असल्याचं वृत्त समोर आलं आणि याबाबत माध्यमांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारले असता त्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सूत्रांच्या हवाल्याने बातम्या देणं बंद करा. आम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर त्याचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेतला जाईल. त्यानंतर पत्रकारांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला कळवण्यात येईल. मात्र, अद्यापतरी कोणताही निर्णय घेतला नाहीये.
लाडकी सुनबाई योजनेबाबतचं वृत्त समोर आलं असलं तरी राज्य सरकारकडून या योजनेच्या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाहीये.
महिलांना आर्थिक पाठबळ देणारी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजना
महायुती सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सुरू केली असून, या योजनेतून पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. राज्यातील महिलांचे सशक्तीकरण व्हावे, त्यांना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीसाठी चालना देणे, त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर बनवणे व महिलांवर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण आहारात सुधारणा करणे या सर्व बाबींचा विचार करून राज्य शासनाने 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.
योजनेसाठी या महिला पात्र
लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असावी. राज्यातील विवाहित, घटस्फोटीत, परित्यक्त्या आणि निराधार महिला आता नवीन बदलानुसार 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला होता. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थी महिलेचे बँक खाते आवश्यक आहे. तसेच यामध्ये कुटुंबातील केवळ एका अविवाहितेलाही या योजनेचा लाभ मिळत आहे. त्याशिवाय लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये.
COMMENTS