बारामती, दि. १५: नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा आणि या स्तंभावर फडकणारा तिरंगा ...
बारामती, दि. १५: नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात राष्ट्रध्वज स्तंभ तरुण पिढीला देशभक्तीची प्रेरणा आणि या स्तंभावर फडकणारा तिरंगा नागरिकांना राष्ट्र प्रेमाची आठवण करुन देईल, स्वातंत्र्य दिनी मिळालेल्या या अमूल्य देणगीचे जतन करण्याकरिता सर्वांनी मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
नटराज नाट्य कला मंदिराच्या परिसरात सामाजिक उत्तरदायित्व निधीतून उभारण्यात आलेल्या ३० मीटर उंच राष्ट्रध्वज स्तंभाच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार सुनेत्रा पवार, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, मुख्याधिकारी पंकज भुसे, नटराज नाट्य कला मंडळाचे अध्यक्ष किरण गुजर, रवींद्र लाड, विविध क्षेत्रातील मान्यवर आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्यलढ्यात बारामतीकरांचा सहभाग
श्री. पवार म्हणाले, कविवर्य मोरोपंत यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या बारामती शहराला ऐतिहासिक महत्त्व आहे. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात विविध देशभक्त आणि क्रांतिकारकांमध्ये बारामतीकरांचा सहभाग होता. सन १९४२ चा लढा तसेच १९४९ च्या स्वातंत्र्य लढ्यात विविध स्वातंत्र्य सैनिक सहभागी झाले होते. नगर परिषदेच्यवतीने सन १९७३ यावर्षी संविधान स्तंभ उभा केला, यामध्ये तालुक्यातील स्वातंत्र्यसंग्रामातील सैनिकांच्या नावांचा शिलालेख समाविष्ट आहे.
राष्ट्रध्वज स्वाभिमान, एकता आणि बलिदानाचे प्रतिक
राष्ट्रध्वज देशाच्या स्वाभिमान, एकता आणि बलिदानाचे प्रतीक आहे, त्यामधील केशरी रंग हा धैर्य आणि त्याग, पांढरा रंग शांती आणि सत्य आणि हिरवा रंग समृद्धी आणि विश्वास तसेच मध्यभागी असलेले अशोक चक्र कायदा आणि प्रगतीचे प्रतीक आहे. महात्मा गांधी, शहिद भगत सिंग, राणी लक्ष्मीबाई, नेताजी सुभाषचंद्र बोस यासारख्या वीरांनी आपल्या प्राणाची आहुती देवून राष्ट्रध्वज उंचावला आहे.
नटराज नाट्य कला मंडळाचे सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान
आज शहरात नटराज नाट्य कला मंडळाच्यावतीने उभारण्यात आलेला राष्ट्रध्वज स्तंभ बारामतीकरांकरिता अभिमान आणि आनंदाची बाब आहे. स्तंभ उभारण्याकरिता मंडळाने केलेल्या प्रयत्नाबद्दल कौतुक करुन हा स्तुत्य असा उपक्रम आहे. गेल्या ४५ वर्षात मंडळाचे सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक, ऐतिहासिक, भावस्पर्शी कथनावरील नाटकांचा समावेश असलेले तीन दिवसीय नाट्य महोत्सवाचे सुद्धा आयोजन केले असून या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार कलाविष्कार पाहायला मिळाला असेल, असा विश्वास श्री. पवार यांनी व्यक्त केला.
COMMENTS