छत्रपती संभाजीनगर: छावा संघटनेच्या नेत्याची गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अवघ्या ४ दिवसांत मृत्यूचं गूढही उलगडले आहे. प्र...
छत्रपती संभाजीनगर: छावा संघटनेच्या नेत्याची गळा चिरून हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी अवघ्या ४ दिवसांत मृत्यूचं गूढही उलगडले आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सचिन पुंडलिक औताडे (वय ३२) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. हर्सूलचा छावा संघटनेचे ते शहर प्रमुख होते. सचिन औताडे यांचा प्रेमसंबंधातील अडथळ्यामुळे गळा चिरून हत्या करण्यात आल्याचे तपासादरम्यान उघड झाले आहे. अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास करून या प्रकरणी छत्रपती संभाजीनगर येथील एक महिलेसह, तिच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.
सचिन औताडे हे ३१ जुलैपासून बेपत्ता असल्याची तक्रार हर्सूल पोलिस ठाण्यात दाखल होती. १२ ऑगस्ट रोजी त्यांचा मृतदेह आढळून आला, तेव्हा शेवगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केल्यावर हा खुनाचा प्रकार असल्याचे समोर आले. पोलिसांच्या तपासात समोर आले की, प्रेमसंबंधातील अडथळ्यामुळे सचिनचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी बुलडाणा येथून दुर्गेश मदन तिवारी आणि भारती रवींद्र दुबे यांच्यासह आणखी एकाला ताब्यात घेतले आहे.
तिवारी आणि भारती यांनी ३१ जुलै रोजी सचिनला बोलावून घेतले आणि त्यांच्या प्रेमसंबंधातील वादामुळे अफरोज खान याच्या मदतीने चाकूने गळा चिरून खून केला. मयत सचिन याने प्रेयसीसोबत लग्न करण्यास नकार दिला होता, याच कारणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृताचा भाऊ राहुल पुंडलिक औताडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अटक केलेल्या दोन्ही आरोपींना शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS