पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे आज (गुरूवार) पहाटे किल्ले शिवनेरीचे दर्शन घेऊन आझाद मैदान, मुंबईकडे जाणाऱ...
पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील हे आज (गुरूवार) पहाटे किल्ले शिवनेरीचे दर्शन घेऊन आझाद मैदान, मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व करणार आहेत. मोर्चा नारायणगाव, मंचर, खेड, चाकण, तळेगाव, लोणावळा मार्गे मुंबईकडे जाणार असून, मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव सहभागी होणार आहेत.
त्यामुळे पुणे जिल्ह्यातील प्रमुख महामार्गांवर आणि शहराच्या आसपास वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
पिपंरी-चिंचवड शहर वाहतूक विभागाने याबाबत विशेष अधिसूचना जारी करत तात्पुरत्या स्वरूपात वाहतूक बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. चाकण, महाळुंगे, तळेगाव, देहूरोड, दिघी-आळंदी, भोसरी, निगडी आणि तळवडे वाहतूक विभागांतर्गत रस्त्यांवर हे बदल लागू होणार आहेत.
पर्यायी मार्ग कोणते पाहा…
1) शिक्रापूरकडून पुण्याकडे जाणारी वाहने: शिक्रापूरहून चाकण चौक मार्गे येणारी वाहने माणिक चौकातून डावीकडे वळून भारतमाता चौक-नाशिक फाटा मार्गे पुढे इच्छित स्थळी जाऊ शकतील.
2) मुंबईहून चाकणकडे जाणारी वाहने: मुंबईकडून येणारी वाहने सेंट्रल चौक-तळवडे गावठाण चौक मार्गे पुढे जातील.
3) मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहने: द्रुतगती मार्गावरून येणारी ही वाहने उसें टोल नाका- सोमाटणे एक्झिट-सेंट्रल चौक-भक्ती शक्ती-नाशिक फाटा-भारत माता चौक मार्गे आळंदी, जोग महाराज धर्मशाळा, चडगाव, कोयाळी, दावडी, निमगाव आणि खेड बायपासमार्गे जातील.
जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील बदल
सोमाटणे ते तळेगाव मार्गे मुंबईकडे जाणारी वाहने आता मुकाई चौक मार्गे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचा वापर करतील. भक्ती शक्ती सर्कल येथूनही वाहनांना अप्पूघर कॉर्नरमार्गे मुकाई चौकात वळविण्यात येईल.
पुणे-नाशिक महामार्गावरील बदल…
भारत माता चौकातून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. यात देहू फाटा, चाकण चौक, आळंदी, जोग महाराज धर्मशाळा, कोयाळी, दावडी आणि निमगाव मार्गे वाहनांना नाशिकच्या दिशेने जाण्याची परवानगी दिली जाईल. हे वाहतूक बदल 28 ऑगस्ट रोजी पहाटे पासून लागू राहतील आणि मोर्चा पुणे ग्रामीण हद्दीतून बाहेर जाईपर्यंत कायम राहतील. या काळात फक्त अत्यावश्यक सेवेतील वाहनांना वगळून इतर सर्व वाहनांना वळविण्यात येणार आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की, पर्यायी मार्गांचा वापर करावा, गर्दी टाळावी आणि वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. या तात्पुरत्या उपाययोजनांमुळे मोर्चा सुरळीत पार पडेल तसेच वाहतूक कोंडी टाळता येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS