"अस्तित्व" म्हणजे स्व अस्तित्वाची जाणीव ====================== पुस्तकाचे नांव....अस्तित्व... लेखक....राजेश साबळे, ओतूरकर प्रका...
"अस्तित्व" म्हणजे स्व अस्तित्वाची जाणीव
======================
पुस्तकाचे नांव....अस्तित्व...
लेखक....राजेश साबळे, ओतूरकर
प्रकाशन....राजसा प्रकाशन
उल्हासनगर
परिक्षण.....साहेबराव पवळे
कवी, कथाकार,
नाटककार, खेड
मूल्य.......रू.200/-
राजेश साबळे ओतूरकर यांचे "अस्तित्व " हे पुस्तक हाती पडले. हे पुस्तक त्यांनी आपले आई आणि वडील (अप्पा व काकू) यांना अर्पण केले आहे. अप्पा आणि काकू म्हणजे लेखकांचे दैवत. त्यांचे अस्तित्व त्यांना क्षणाक्षणाला जाणवत रहाते म्हणून हे पुस्तक जन्मास आले. आतापर्यंत त्यांनी २१ पुस्तके वाचकांसमोर मांडली आहेत. ११ कवितासंग्रह व १० कथासंग्रह लिहीलेले आहेत. त्यांनी मुंबई महानगरपालिकेत शिक्षण विभागात ३८ वर्षे नोकरी केली आहे. त्यांच्या नसानसात शिक्षणाचा वसा पेरलेले आहे. आता त्यांनी स्वतःला साहित्य क्षेत्रात झोकून दिले आहे.
अस्तित्व हा त्यांचा २६ लेखसंग्रह आहे. अस्तित्व जाणवणे हे महत्वाचे आहे. त्यांनी हे सुत्र जपले आहे. हे कठीण व्रत आहे. पण त्यांनी स्वीकारले आहे. कारण संस्कार त्यांच्या मनावर रुजवले गेले आहेत. याउलट नवी पिढी कोणाचेही अस्तित्व माणत नाही. त्यांना फक्त मोबाईल चे अस्तित्व लागते. जेवण नसेल तरी चालेल पण मोबाईल हवा. एकवेळ बाहेर जाताना हातात रुमाल नसेल तरी चालतो पण हातात मोबाईल हवा.अधिका-यां जवळ मोबाईल असणे आवश्यक असते कारण कर्मचारी कोणत्या परिस्थितीत आहे हे त्यांना माहित असणे आवश्यक असते. त्यांना त्यांचे अस्तित्व जाणवणे महत्वाचे आहे. पण आताची अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यांचे अस्तित्व किती जाणवतात हा संशोधनाचा विषय आहे.
मुलगी सासरी गेली की तिला माहेरचे आई बाप , चुलता चालती, पुतणे पुतणी आठवतात. ती माहेरी आल्यावर तिला सासू सासरे, दिर जावा, त्यांची मुले आठवत असतात यालाच अस्तित्व म्हणतात.
अस्तित्वाची सांगड राजेश साबळे यांनी घातली आहे. हे त्यांचे लेखन काल्पनिक असले तरी खरे वाटते. त्यांना ग्रामीण जीवन अनुभवलेले आहे. त्यामुळे या लेखामधील प्रसंगाला जिवंत पणा आलेला आहे. हेच त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे.
अस्तित्व या लेखात बायकोला नव-याचे अस्तित्व जाणवत असते. ती म्हणते बाईने ठरविले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जुन्या रूढी, परंपरा, संस्कार, संस्कृती चांगल्या आहेत. त्यात पुरूष प्रधान संस्कृतीचे वर्चस्व आहे. तरी त्यात बाईला अस्तित्व सिध्द करण्यासाठी मोकळीक आहे. श्रध्दा की अंधश्रद्धा या लेखात लेखकाने आपले शिक्षण कौशल्य पणाला लावले आहे. ते म्हणतात आपण एखाद्याचा विश्वास तोडू शकत नाही. जे दुःखातून जातात त्यांना सुध्दा पुर्ण माहीत असते. पण त्याला श्रध्दा कोणी अंधश्रद्धा म्हणतात. या सर्व गोष्टी आपल्या हातात नसतात. विज्ञान जगात आपण वावरत असलो तरी दुकानाचे उद्घघाटन करताना तिथी, तारीख, वेळ पहातच असतो.
संकेत हा लेख सत्य घटना आहे असे लेखक म्हणतात. कोणत्याही घटनेचे संकेत मिळत असतात. पण त्याचा मागोवा मानवाला अजुनही लागला नाही. मग तो म्हणत रहातो घडणा-या गोष्टी घडत असतात. त्या कोणीही आडवू शकत नाही. त्या स्वीकारणे एवढच आपल्या हातात असते.
लेखकाने नानेघाट रानभाजी महोत्सव या लेखाद्वारे समाजाला शिकविण्याचा प्रयत्न केला आहे. ते प्रांजळ पणे कबुल करतात की आदिवासी मंडळींनी आपले संस्कार, संस्कृती, परंपरा कलेच्या स्वरूपात जोपासल्या आहेत..पण शहरात विज्ञान व तंत्रज्ञानाच्या नादात पारंपारिक सण उत्सव यांना विकृत स्वरूप प्राप्त झाले आहे याची वाईट वाटते. विज्ञान युगात वावरणारी मंडळी आपले भारतीय संस्कार परंपरा याला गालबोट लावित आहेत याचे त्यांना भान नसते. ज्यांनी नानेघाट खोदून पायवाट तयार केली कोणतीही साधन सामग्री नसताना केले हे मोठे आश्चर्य आहे. पूर्वीचे काम हजारो वर्षाची साक्ष देतात. पण कलीयुगात दोन महिन्यापुर्वी किंवा वर्षा पूर्वी बांधलेले पुल रस्ते गायब होतात. जे कौशल्य व तंत्रज्ञान जमिनीवरील माणसांना सुविधा पुरवू शकत नाही ते चंद्रावर जातात व संशोधन करतात. ते मनातील शल्य सांगतात सामाजीक संस्कृतीची सोक्षमोक्ष देणारा टोल वसुलीचा दगडी रांजण, दगडात कोरलेल्या गुंफा आणि भिंतीवर कोरलेली अक्षरे यांचे संशोधन आजच्या संशोधन करणा-या पिढीला संशोधन सापडणार आहेत का?..
साबळे सरांचे डाॅ. शरद घाटे सर यांच्या विषयी फक्त एका ओळीत लिहीत आहेत. आज जीवनाचा आनंद कसा घ्यावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे डाॅ. सर हे होय. प्रा. नागेश हुलकवळे यांच्याविषयी म्हणतात मित्र असावा तर प्रा. नागेश सांसारिक निव्वळ शुध्द आनंद देणारा असावा. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी द्यावे. असा निरागस निखळ मैत्रीचा स्वच्छ सुंदर झरा म्हणजे प्रा. नागेश हुलवळे सर.
मराठी भाषा आणि तिचा उगम या लेखात राजेश साबळे सांगतात की मराठी भाषा ही 14 शतक जुनी आहे. ज्ञानेश्वरांनी 22व्या वर्षी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहीला. तुकाराम महाराजांनी अभंगातून व रामदासांनी श्लोकातील मराठीत गुणगान केले आहे म्हणून म्हणतात "ज्ञानेदेवे रचिला पाया तुका झालास कळस."
आता इंग्रजीचा प्रसार आणि प्रचार वाढला आहे. कालांतराने आपल्याला मराठी शिकायला परदेशात जावे लागेल.कारण आता अमेरिका, जपान, इंग्लंड येथे मराठी शिकवली जाते. मराठीच्या नावाने गळा काढणारे लोक पहायला मिळतात. पण इंग्रजी माध्यमाच्या शाळा निर्माण होताना दिसतात. आपण आपली मातृभाषा जपली नाहीतर मराठी इंग्रजीच्य दारात भीक मागते असे चित्र दिसत आहे.
लेखकांनी आपल्या पुतण्याचे म्हणजे महादेव याचे व्यक्ती चित्र " पोटातले ओठावर.." या लेखातून केले आहे. ते वाचल्यानंतर तो समोर
बसला आहे असा भास होतो.
" तो आता पहिल्यासारखा येत नाही" या लेखाद्वारे लेखकाने पावसाबरोबर गप्पा मारताना काही हातचे राखून ठेवले नाही. पुर्वीच्या काळापासून आतापर्यंतचा सर्वात प्रवास लेखकाने प्रेमाने सांगितला आहे. शेवटी लेखक पावसाला सांगतो आहे की " झाली असेल आमची चूक तर ती पदरात घे. मांडवली करून ये. पण येत जा. तुझं मनापासून स्वागत आहे.
"स्री आणि सामाजिक उन्नती " या लेखातून लेखक राजेश साबळे यांनी महिलांचा जीवनपटच वाचकासमोर मांडला आहे. ते लिहीतात एका बाजूला स्त्रीला देवतेचे स्वरूप दिले आणि दुस-या बाजूला डोक्यावर ,पदर, पुरूष मंडळीत बोलत बसायचे नाही, मंदिराच्या गाभा-यात जायचं नाही. चार चौघात बसायचं नाही.फक्त मुलांना जन्मास घालायचे, त्यांना वाढवायचे एवढच तिचं काम. पण कोणी काहीही म्हणा पुरूषापेक्षा महिला जादा काम करतात असं साधारणपणे दिसते. मुळातच महिला सुशिक्षित असतात. आता शिक्षणामुळे महिला शिकल्या आणि बाहेर पडल्या आहेत. आता त्या नोकरी उद्योगधंदा करू लागल्या आहेत. आता किती मुलांना जन्म द्यायचा हे तिच्या मनावर आहे. आता एकत्र कुटूंब तुटत चालली आहेत आणि संस्कार आणि संस्कृती लोप पावत चालली आहे.शिकलेली मुले मुली आपलं वैवाहिक जीवन कलह प्रधान करीत आहे.त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण वाढत आहे. शिक्षणाने माणसं जोडली जाण्याऐवजी ती दूर जात आहेत.
" कोणाची कोंबडी अन् पिल्ल" या लेखाद्वारे लेखकाने जुन्या जमान्यातील महत्ती, एकोपा सांगितला आहे. पुर्वी एकत्र कुटुंबात कोण कोणाचा मुलगा मुलगी ओळखणे अवघड जात होतं.आता नविन जमाना आला हम दो हमारे दो . पुर्वी एका एका माणसाला एक एक डझन अपत्य होत होती. पण त्या मुलांची आई भक्कम असायची. आता उलट झाल आहे. एका मुलांवर दुसरं मुल नको असं आई नव-याला सांगते. आता एक मुलगा वाढविणे कठीण झाले आहे. " अंड्याची पोळी" या लेखाद्वारे लेखकाने असे सांगितले आहे की माणसाने माणसं जपायला शिकले पाहिजे. गोड बोलून किसान गळा कापणं किंवा आवळा देवू कोवळा काढायला नको. "सुख म्हणजे नक्की काय असते " या लेखाद्वारे लेखकाने आपल्या आजीच्या शब्दाला मान दिला आहे.आजी म्हणायची चागल्याचा संसार तर कोणीही करील पण दुबळ्या संसार नक्कीच करणं लई पुण्याच काम असतं. लेक सासरी कशी नांदते यावर तिच्या माहेरचं कौतुक असतं. जिथ घरात नवरा बायको एकमेकाशी बोलताना दिसत नव्हते तिथे चार मोठी माणसं बसून प्रश्न सोडवित असत. यात मध्यस्ती करणारी मंडळी खुप महत्वाची होती. मुला मुलींचा लग्न आई बाप चुलते आजी आजोबांच्या मर्जीने होत होती. त्यामुळे घटस्फोट कमी होते. पण आता नव्या जमान्यात सर्व उलट झालं आहे.आता लग्न मुला मुलींच्या मर्जीनुसार होतं. त्यामुळे घटस्फोटाचे प्रमाण जास्त आहे. पुर्वीच्या काळी लोक म्हणायचे जे लोक दीन दुबळ्यांचा विचार करतात त्यांच्या पाठीशी देव असतो.
राजेश साबळे यांना म्हता-या माणसाचे अचुक बोल आवडतात ते म्हणतात आमची आजी म्हणायची....
"संसार तर कोणीही करील पण दुबळ्यांचा संसार नेटान करण लई पुण्याच काम असतं"
"बापाचाच पायताण पोरांच्या पायाला आला की बापानं ही समजुन जावं"
"पाखडताना सुपात सांडलेलं वाकून उचलल असतं...तर तिची कंबर गेली असती? चार येळा तंगड्या वगळून गेली...पण मेली कणभर वाकली नाय माय"
"धोनी वाणी हाय मेली"
"घोड्यावाणी पदर उडवीत गेली..पण जरा वाकली नाय...काय तर म्हणे चवळीची शेंग आहे...जरा लवली वाकली असती तर्कात तिची कंबर मोडली असती."
" वली व्हती तवा चेपली असती तर काट्याच्या फणसासारखे कवाच सरळ झाली असती."
"लयं झालं उफणून जरा भानावर ये.
म्हणं माझ्या बापाचं खात्यात...अन्
मलाच बोलण्यात."
" अग ये सेवेत असं काय दिलं गं तूझ्या बापानं म्हणून लई नाक उचलुन बोलते."
"ए बाई मी काय तुझ्या बापाचाच खात नाय..मी माझ्या नव-याच्या शेतात पिकतं ते खाते"
" हाय का बया म्या तर नखभरचं खालं पण या चाभरीन सा-या गावभर केलं."
"ये चिमुकली उडू न ग. म्हण माहेरी जाते. ही तुझी चिली पीली विकावी घालून पिशवीत अन् निघून बघू लवकर "
कवी संजय गवांदे राजेश साबळे यांच्या विषयी म्हणतात.
" पांढ-या शुभ्र केसावरून
यांच्या कोणी जाऊ नका
किती साहित्यिक ओढ
विनानुभव विचारू नका
पाढ-या केसांवर जाऊ नका,
तो तर चंदेरी विश्वाचा राजा
राजेश साबळे होऊन बघा."
अशा या सत्तरी पार केलेल्या साहित्यिक राजेश साबळे ओतूरकर यांना मानाचा मुजरा. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छां.
...साहेबराव पवळे, राजगुरूनगर
12.08.2025
..साहेबराव पवळे
कवी, कथाकार,नाटककार,
राजगुरूनगर/वारजे पुणे
COMMENTS