ठाणे : शहापूर तालुक्यात दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित युवतीने सासरच्या छळाला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादाय...
ठाणे : शहापूर तालुक्यात दोन महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित युवतीने सासरच्या छळाला कंटाळून राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी किन्हवली पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
छकुली बाळकृष्ण केदार असे आत्महत्या करणाऱ्या नवविवाहित युवतीचे नाव आहे. ती मुरबाड तालुक्यातील धसई विभागातील पिंपळघर गावातील रहिवासी होती. दोन महिन्यांपूर्वी म्हणजेच 1 मे 2025 रोजी तिचा विवाह शहापूर तालुक्यातील खरीवली गावातील रहिवासी कैलास हरड याच्या सोबत झाला होता. लग्नानंतर पैशांसाठी तिचा छळ केला जात होता. काही दिवसांपूर्वी आरोपींनी छकुलीकडे एक लाख रुपयांची मागणी केली होती. तिने वडिलांकडून हे पैसे आणावेत म्हणून पतीसह तिच्या सासरच्यांकडून दबाव टाकला जात होता. पण छकुली हे पैसे आणू शकली नाही. यानंतर आरोपींनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला, असा आरोप मृत छकुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.
आरोपींनी फ्लॅट घेण्यासाठी देखील छकुलीकडे २० लाखांची मागणी केली. तू तुझ्या बापाकडून 20 लाख घेऊन ये, असं म्हणत आरोपींनी तिला मारहाण केली. या प्रकारानंतर पीडितेनं सासरच्या मंडळींना समजून सांगितले की माझे वडील एक वडापावची गाडी चालवतात. त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतील, पण तरीही सासरच्यांकडून छळ सुरू होता, अशी माहिती मृत छकूलीची आई रंजना बाळकृष्ण केदार यांनी दिली.
रंजना केदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, किन्हवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिचा पती कैलास हरड याला अटक केली आहे. पुढील तपास किन्हवली पोलिस करत आहेत. दरम्यान, लग्नानंतर अवघ्या दोनच महिन्यात युवतीने आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


COMMENTS