Maharashtra Rain Alert:- महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार सुरुवात केली असून, कोकण आणि घाटमाथा भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभा...
Maharashtra Rain Alert:- महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार सुरुवात केली असून, कोकण आणि घाटमाथा भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २१ जूनपासून राज्यात काहीसा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे, पण कोकण व घाटमाथ्यावर मात्र दमदार सरी कायम राहणार आहेत.
यामुळे या भागात पावसामुळे डोंगराळ भागात भू-स्खलनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, मराठवाडा व विदर्भात विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या हवामानाच्या बदलामुळे शेतकरी वर्ग, पर्यटनस्थळी जाणारे नागरिक तसेच वाहतूक व्यवस्थेला योग्य खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शुक्रवारी राज्यातील हवामान कसे होते?
शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांच्या आत यवतमाळमध्ये राज्यातील सर्वाधिक ३९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर, पावसाच्या बाबतीत नाशिक जिल्ह्यातील हर्सूल आणि सातारा जिल्ह्याच्या महाबळेश्वर येथे अनुक्रमे २१० मिलिमीटर इतक्या दमदार पावसाची नोंद झाली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा परिसरात काही भागांत अतिवृष्टी झाली असून, अनेक नद्या आणि नाल्यांना पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कमी दाबाच्या क्षेत्राची स्थिती कशी?
राज्यात सध्या उत्तर भारतातील कमी दाबाचा प्रभाव दिसून येतो आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र आता निवळत असून ते दक्षिण बिहार परिसरात स्थित आहे. त्यासोबत ७.६ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत, जे पुढील हवामान घडामोडींवर परिणाम करू शकतात. याचबरोबर राजस्थानपासून मेघालयपर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे आणि उत्तर प्रदेश ते गुजरातपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे वातावरणात अनिश्चितता वाढली आहे.
देशपातळीवर पाहता, नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी आता मध्य भारतात चांगलाच प्रभाव टाकला आहे. २० जून रोजी पर्यंत मॉन्सूनने मध्य प्रदेश, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश व्यापले असून, पुढील काही दिवसांत पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर व लडाखच्या काही भागांतही मान्सून पोहोचणार आहे. त्यामुळे उत्तर भारतात पावसाचे प्रमाण लवकरच वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील या भागात जोरदार पावसाचा इशारा
हवामान विभागाने ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच पुणे आणि साताऱ्याच्या घाटमाथा भागांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे. या ठिकाणी नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा व सुरक्षित ठिकाणी राहावे असा सल्ला देण्यात आला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर तसेच विदर्भातील अमरावती, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजांसह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
COMMENTS