वर्धा: वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात शेतीच्या वादावरून झालेल्या वादात चुलत भावाने आपल्या काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीने हत्या केल्याची ध...
वर्धा: वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात शेतीच्या वादावरून झालेल्या वादात चुलत भावाने आपल्या काकू आणि चुलत भावाची कुऱ्हाडीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर आरोपीने विष प्राशन करून आत्महत्या केली.
या दुहेरी खून आणि आत्महत्येच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
साधना सुभाष मोहिजे (वय 55) आणि त्यांचा मुलगा नितीन सुभाष मोहिजे (वय 27) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. महेंद्र मोहिजे याने दोघांची हत्या केल्यानंतर स्वःत आत्महत्या केली. गेल्या काही दिवसांपासून महेंद्र आणि नितीन यांच्यामध्ये शेतीच्या वाटपावरून वाद सुरू होता. शुक्रवारी सकाळी वाद इतका टोकाला गेला की, महेंद्र मोहिजे याने संतप्त अवस्थेत नितीन आणि त्याची आई साधना यांच्यावर कुऱ्हाडीने हल्ला करत त्यांचा जागीच खून केला. खून केल्यानंतर महेंद्रने स्वतः विष प्राशन केले आणि काही वेळातच त्याचाही मृत्यू झाला. ही घटना समजताच अल्लीपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस अधीक्षक अनुराग जैन आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल चौहान यांनीही घटनास्थळी भेट दिली आणि संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वर्धा जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महेंद्र मोहिजे हा साधना मोहिजे यांचा पुतण्या होता, तर नितीन मोहिजे त्याचा चुलत भाऊ होता. शेतीच्या मालकीहक्कावरून आणि उत्पन्नाच्या वाटपावरून अनेक दिवसांपासून हे वाद सुरू होते. पोलीस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS