लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या व...
लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. तब्बल 232 मतदारसंघांमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी झाले, तर महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावं लागलं होतं. भाजप हा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरला.
दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. महाविकास आघाडीमधील पक्षांना गळती लागल्याचं पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांसोबतच पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. याचा सर्वात मोठा फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे. मात्र आता काँग्रेसला देखील मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा आणखी एक नेता भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी आमदार कुणाल पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. कुणाल पाटील यांच्यावतीनं आज कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला. मात्र या मेळाव्यात कुठल्याही काँग्रेस नेत्याचे फोटो आणि बॅनर नव्हतं, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. कुणाल पाटील हे धुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे मोठे नेते आहेत, त्यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर हा धुळ्यामध्ये काँग्रेसला मोठा धक्का असणार आहे.
माझा पराभव झाला असला तरी या तालुक्यातील किमान 1 लाख लोकांनी मला मते दिली आहेत. ज्यांनी नाही केलं त्यांनी देखील मला गेल्या दोन पंचवार्षिकला मतदान केलं आहे. त्यामुळे 2029 ला कुणाल पाटील उभा राहिला तर लोक 2 लाख मतांनी निवडून देतील. आज या मेळाव्यात कार्यकर्ते पण माझ्यासोबत आहेत, कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागेल, मात्र मी उद्या भाजपात गेलो किंवा राष्ट्रवादीत गेलो तरी तोच सन्मान मला असणार आहे. वेळ जशी येईल तसा निर्णय घेवू, जो पण मी निर्णय घेईल तो तुमच्या होकारेनच घेईल, असं यावेळी पाटील यांनी म्हटलं आहे.
COMMENTS