पुणेः पुणे शहरातील खराडी भागात राहणाऱ्या एका महिलेला लग्न जमविणाऱ्या एका साईटवरून 3 कोटी 60 लाख रुपये रकमेला फसवल्याची धक्कादायक घटना समोर...
पुणेः पुणे शहरातील खराडी भागात राहणाऱ्या एका महिलेला लग्न जमविणाऱ्या एका साईटवरून 3 कोटी 60 लाख रुपये रकमेला फसवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अभिषेक शुक्ला (रा. लखनौ, उत्तर प्रदेश) या आरोपीला पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
फेक प्रोफाईल तयार करून आरोपीने महिलेस फसवल्याचे समोर आले आहे.
दिल्लीतील एक महिला खराडी परिसरात वास्तव्याला असताना, तिची ऑनलाईन एका प्रोफाइलवरून ओळख 'डॉ. रोहित ओबेरॉय' या नावाने स्वतःला ऑस्ट्रेलियन नागरिक म्हणवणाऱ्या व्यक्तीशी झाली. ओळखीनंतर मैत्री आणि नंतर लग्नाचं आमिष दाखवत आरोपीने महिलेशी जवळीक वाढवली. महिला आणि आरोपी यांनी काही काळ एकत्र वास्तव्यही केले.
महिलेला तिच्या पहिल्या पतीकडून 5 कोटी रुपयांची पोटगी मिळालेली होती. ती आपल्या व्यवसायासाठी आर्थिक गुंतवणूक करत होती. ही माहिती मिळताच आरोपीने तिचा विश्वास संपादन करून तिचा व्यवसाय आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचे आमिष दाखवले. सिंगापूर व भारतातील बँक खात्यांत वेळोवेळी रक्कम भरायला लावली. महिलेने एकूण 3 कोटी 60 लाख 18 हजार 540 रुपये वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये भरले. काही महिन्यांनंतर आरोपीने बोलणं बंद केले. पुढे त्याचा साथीदार 'विन्सेंट' याने मेल करून त्याच्या मृत्यूची बनावट माहिती दिली. यानंतर महिलेच्या लक्षात फसवणूक झाल्याचे आले.
तांत्रिक विश्लेषणद्वारे पिडीताला फसवणाऱ्या व्यक्तीचे डॉ. रोहित ओबेरॉय नसून त्याचे खरे नाव अभिषेक शुक्ला (मूळ राहणार लखनऊ, सध्या राहणार पर्थ, ऑस्ट्रेलिया) असे निष्पन्न झाले. तसेच आरोपी हा बाहेरील देशात असल्याची माहिती मिळाल्याने त्याचे नावाचे लुक आउट सर्क्युलर (LOC) तात्काळ जारी केले असता, 25/06/2025 रोजी सदर आरोपी सिंगापूरवरून मुंबईला आल्याची खबर मिळताच मुंबई एअरपोर्टवर त्यास ताब्यात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने अटक केली असून सध्या आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे. दरम्यान, आरोपीने एकूण 3,194 महिलांना मेसेज करून संपर्क साधला होता. त्यामुळे आणखी किती महिलांची फसवणूक झाली आहे, याचा पुढील तपास करत आहेत.
COMMENTS