मुंबई: एका युवतीने प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना अंधेरी (पूर्व) परिसरात घडली आहे. शंकर रामचंद्र कांबळ...
मुंबई: एका युवतीने प्रियकराच्या मदतीने स्वत:च्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना अंधेरी (पूर्व) परिसरात घडली आहे. शंकर रामचंद्र कांबळे (वय ५८) असे मृत पावलेल्या वडिलांचे नाव आहे.
शंकर रामचंद्र कांबळे यांनी त्यांच्या मुलीच्या अनैतिक संबंधांना विरोध केला होता. याच कारणातून मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने वडिलांची हत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.
याप्रकरणी अंधेरी एमआयडीसी पोलिसांनी आरोपी मुलगी सोनाली बैत (वय ३७) आणि तिचा प्रियकर महेश पांडे (वय २७) यांना अटक केली आहे. आरोपी सोनाली तिच्या अनैतिक संबंधांना विरोध केल्याने प्रचंड संतापली होती. या रागातून तिने तिच्या वडिलांवर तीन दिवसांत दोनदा हल्ला केला. इतकेच नाही तर तिने तिचा भाऊ राहुल शंकर कांबळे (वय २८) यालाही मारहाण करून गंभीर जखमी केले. राहुलवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर कांबळे घाटकोपरच्या भटवाडी परिसरात राहत होते. त्यांची मोठी मुलगी सोनाली हिचा २००८ मध्ये अमोल बैतशी विवाह झाला होता. सोनालीला दोन मुलेही आहेत. पण ती २०२२ पासून तिच्या पतीपासून वेगळी झाली. ती तिचा प्रियकर महेश पांडेसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहू लागली. ही बाब सोनालीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हती. या अनैतिक संबंधांना वडिलांचा विरोध होता. या कारणावरून वारंवार वाद होत होते.
शंकर कांबळे ८ जून रोजी कामावर गेले असताना, तिथे सोनाली तिचा प्रियकर महेश पांडेसह तिथे पोहोचली. यावेळी बापलेकीमध्ये वाद झाला. वडिलांनी मुलीच्या अनैतिक संबंधांना विरोध केला. यावेळी संतापलेल्या प्रियकराने थेट सोनालीच्या वडिलांना चापट मारली. त्यावेळी कुटुंबाने पोलिसात तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी दोघांनाही समज देऊन सोडून दिले होते. यानंतर, ११ जून २०२५ रोजी संध्याकाळी सोनाली आणि महेश यांनी अंधेरी-कुर्ला रोडवरील एका हॉटेलबाहेर शंकर कांबळे यांच्यावर हल्ला केला. यावेळी शंकर यांचा मुलगा राहुल याने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यालाही मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात शंकर कांबळे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून सोनाली बैत आणि महेश पांडे यांना अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS