पुणे: अॅपचा वापर करून भक्तांचे खासगी क्षण आपल्या मोबाइलमध्ये पाहणाऱ्या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. मृत्यूची भीती दाखवून हा भोंदूबाब...
पुणे: अॅपचा वापर करून भक्तांचे खासगी क्षण आपल्या मोबाइलमध्ये पाहणाऱ्या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. मृत्यूची भीती दाखवून हा भोंदूबाबा भक्तांना शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडायचा.
एका भक्ताच्या तक्रारीवरून बावधन पोलिसांनी प्रसाद उर्फ दादा तामदार याला अटक केली आहे. एका छु्प्या अॅपच्या माध्यमातून हा भोंदूबाबा भक्तांचे खासगी क्षण पाहत होता. मात्र, तक्रारदार व्यक्तीच्या सायबर तज्ज्ञ असलेल्या मित्रामुळे हे सगळं कांड समोर आले आहे.
अध्यात्मिक बाबा असलेला प्रसाद तामदार (वय 29) हा काही भक्तांना मृत्यूची भीती दाखवायचा. भोंदूबाबा भक्तांना त्यांची प्रेयसी अथवा देहविक्री करणाऱ्या महिलांसोबत शरीर संबंध ठेवण्यास सांगायचा. त्यानंतर भोंदूबाबा त्याच्या मोबाइलमध्ये भक्तांचे खासगी क्षण पाहायचा.
एका भक्ताने (वय ३९) दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी भोंदूबाबा आपल्याला दिव्यशक्तीची अनुभूती झाली असल्याचे सांगायचा. काही तरुण भक्तांना हा भोंदूबाबा तुमचा मृत्यू येत्या 4 ते 5 महिन्यात होणार असल्याचे भाकित करायचा. हे संकट टाळण्यासाठी तो भक्तांना एकांत ठिकाणी बसवून मंत्रजप करण्यास सांगायचा. मात्र, त्याआधी त्यांचा मोबाइल घेऊन त्यांच्याकडूनच त्यांचा पासवर्ड घेऊन मोबाइल अनलॉक करत असे. त्यानंतर मोबाइलमध्ये गुपचूप एक हिडन अॅप इन्स्टॉल करायचा. या अॅपमुळे बाबाला भक्तांचे लोकेशन,आवाज, कॅमेरा याचे अॅक्सेस मिळायचे. या अॅपच्या साहाय्याने हा बाबा भक्तांनी कोणत्या कलरचा शर्ट घातला आहे, आता कुठं आहे, याची माहिती सांगायचा. त्यामुळे भक्तांना याच्यावर जास्त विश्वास बसू लागला होता. पण, त्यानंतर हा बाबा भक्तांना प्रेयसी, देहविक्री करणाऱ्या महिला यांच्याशी शरीर संबंध ठेवण्यास सांगायचा. पण हे करताना मोबाइल कॅमेरा विशिष्ट अँगलमध्ये ठेवण्यास सांगत असे. त्यावेळी बाबा हे खासगी क्षण पाहायचा आणि त्याचे चित्रीकरण करत असे.
एका भक्ताचा मोबाइल सतत गरम होऊ लागला. त्यामुळे हा मोबाइल तपासण्यासाठी त्याने आयटी मित्राची मदत घेतली. मित्राने लॅपटॉपला मोबाइल लावल्यानंतर त्यात एक हिडन अॅप असल्याचे दिसून आले. हे अॅप बाहेरुन त्रयस्थ व्यक्ती हाताळत असल्याचे दिसून आले. त्यानंतर आपण मोबाइल फोन हा बाबाच्या हातात दिल्याचे लक्षात आले. या युवकाने इतर काही भक्तांशी संपर्क साधला. त्यांच्या मोबाइलमध्येही तेच अॅप असल्याचे आढळून आले. ही फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या भोंदूबाबाला जाब विचारण्यासाठी काही भक्त गेले. त्यांनी जाब विचारल्यानंतर भोंदूबाब घाबरला. पोलिसांकडे तक्रार न करण्याची विनवणी करू लागला. मात्र, एका तरुणाने पोलिसांना फोन करून त्यांना बोलावले. त्यानंतर बावधन पोलिसांनी तक्रारीवरून त्याला अटक केली. भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS