मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईत हिंदी सक्तीविरोधातील मोर्चा निमित्त एकत्र येत आहेत. दोघांचे मनोमिलन होण...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईत हिंदी सक्तीविरोधातील मोर्चा निमित्त एकत्र येत आहेत. दोघांचे मनोमिलन होण्यापूर्वी मोर्चा मिलन होत असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या घडामोडी घडत असताना राष्ट्रवादीतही एकत्रीकरणाची हवा जोर धरू लागली आहे. अगदी काही दिवसांपूर्वी भाजपाच्या वाऱ्याला ही उभं राहायचं नाही असा स्पष्ट भूमिका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतली होती. तर आता पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रिकरणाविषयी मोठे भाकीत केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या भुवया उंचावल्या आहेत. तर कार्यकर्त्यांमध्ये शंभर हत्तीचे बळ संचारले आहे. काय म्हणाले शरद पवार?
मनसे आणि शिवसेनेच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? असा सवाल शरद पवार यांना कोल्हापूरात माध्यम प्रतिनिधींनी विचारला. राजकारणात मतभेद विसरून एकत्र येऊन चांगले काम करणे कधीही चांगलेच. त्यामुळे सगळे मतभेद विसरून आम्ही एकत्र येत असू तर ते चांगलेच आहे असे स्पष्ट संकेत पवारांनी दिले. सगळे मतभेद विसरून चांगले काम केले तर वाईट वाटायचे काम नाही असे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर त्यांनी भाष्य केले.
तर मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना एकत्र आले तर चांगलेच आहे. दोन भाऊ मतभेद विसरून एकत्र येणे चांगलेच असते. पण ते एकत्र येतील की नाही हे सांगायला आपण ज्योतिषी नसल्याचा चिमटाही त्यांनी काढला.
दोन्ही पवारांनी एकत्र यावे, असं मला वाटतंय. एकत्रित आल्यास माझ्यासह राज्यातील कार्यकर्त्याना आनंदच होईल, असे वक्तव्य शरद पवार गटाचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी केले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येण्या संदर्भात मी स्वतः खासदार शरद पवार,खासदार सुप्रिया सुळे व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याशी बोलून एकत्रित येण्या संदर्भात आग्रही भुमिका मांडली असल्याचे ते म्हणाले. दोन्ही पवार एकत्र येण्यासाठी पाडुरंगाला मी साकडे घातले आहे.
दोन्ही ठाकरे आपल्या मराठी भाषेच्या अस्मितेच्या विषयावरुन एकत्रित येत आहेत. त्यांचा महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला आनंदच आहे. पाचवी इयत्तेनंतरच हिंदी असायला हवे असे मला वाटते. .मराठी भाषेच्या अस्मितेसाठी ठाकरे बंधुच्या लढ्याला माझा पाठिंबा आहे.एकीकडे मराठी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आणी दुसरीकडे सरकारने सक्ती करायची यातून सरकारची दुटप्पी भूमिका स्पष्ट होत असल्याचा टोला पाटील यांनी लगावला.
COMMENTS