हैद्राबाद (तेलंगणा): देशात गेल्या काही दिवसांपासून राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण गाजत आहे. पत्नी सोनम रघुवंशीने हनिमूनला गेल्यानंतर आपल्या प...
हैद्राबाद (तेलंगणा): देशात गेल्या काही दिवसांपासून राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण गाजत आहे. पत्नी सोनम रघुवंशीने हनिमूनला गेल्यानंतर आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली.
हत्येची ही घटना ताजी असताना अशीच एक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेनं लग्नानंतर अवघ्या महिनाभरातच पतीची निर्घृण हत्या केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीसह तिच्या आईला अटक केली आहे.
कर्नूल येथील तेजेश्वर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पत्नी ऐश्वर्या आणि तिची आई सुजाता या दोघींना अटक केली आहे. आरोपी मायलेकीचे एकाच बँक कर्मचाऱ्याशी अनैतिक संबंध सुरू होते. याच संबंधातून त्यांनी ही हत्या केल्याची माहिती पुढे येत आहे. संशयित बँक कर्मचारी सध्या फरार आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
तेजेश्वरच्या कुटुंबाने १३ फेब्रुवारी रोजी कुर्नूल येथील ऐश्वर्या नावाच्या युवतीशी आपल्या मुलाचं लग्न ठरवले होते. लग्नाच्या फक्त पाच दिवस आधी ऐश्वर्या अचानक गायब झाली. तेव्हा ती कुर्नूलमधील एका बँक कर्मचाऱ्यासोबत पळून गेल्याची अफवा पसरली होती. तथापि, ती १६ फेब्रुवारी रोजी परत आली आणि तिने असा दावा केला की तिच्या आईवर हुंड्याची व्यवस्था करण्यासाठी दबाव होता. त्यामुळे ती एका मैत्रिणीच्या घरी गेली होती.
ऐश्वर्याने पुन्हा तेजेश्वरला विश्वासात घेत त्याच्यावर प्रेम असल्याचे सांगितलं. त्यामुळे दोन्ही कुटुंबांची इच्छा नसतानाही त्यांनी १८ मे रोजी लग्न केले. लग्नानंतर ऐश्वर्या सतत फोनवर कुणाशी तरी बोलत होती, हे तेजेश्वरच्या लक्षात आले होते. १७ जून रोजी अचानक तेजेश्वर गायब झाला. या प्रकारानंतर तेजेश्वरच्या भावाने बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी खोलात जाऊन तपास केला असता धक्कादायक खुलासा समोर आला. चौकशीदरम्यान ऐश्वर्या आणि तिची आई सुजाता यांनी कबूल केले की दोघांचेही एकाच बँक कर्मचाऱ्याशी प्रेमसंबंध होते. सुजाता ही त्याची दीर्घकाळची पार्टनर होती आणि नंतर ऐश्वर्याचे देखील त्याच्यासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. कॉल डेटा रेकॉर्डवरून असे दिसून आले की, लग्नानंतरही ऐश्वर्या बँक कर्मचाऱ्याशी २००० हून अधिक वेळा बोलली होती.
बँक कर्मचाऱ्याने काही जणांना सुपारी देऊन तेजेश्वरची हत्या घडवून आणल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. तेजेश्वरची मालमत्ता हडपायची आणि ऐश्वर्याच्या आयुष्यातून त्याला घालवायचं, या कारणातून ही हत्या झाली असावी, असा पोलिसांना संशय आहे. घटनेच्या दिवशी आरोपी मारेकऱ्यांनी तेजेश्वरला १० एकर जमिनीचे सर्वेक्षण करण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवले. कारमध्ये मारेकऱ्यांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्याची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर आरोपींनी तेजेश्वरचा मृतदेह एका निर्जनस्थळी फेकून दिला. या प्रकरणी पोलिसांनी ऐश्वर्या आणि तिची आई सुजाता यांना अटक केली आहे. हत्येत सहभागी असणारा बँक कर्मचारी आणि इतर गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
COMMENTS