अहिल्यानगर : क्रिकेटचा वादावरून आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी विद्य...
अहिल्यानगर : क्रिकेटचा वादावरून आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने दहावीत शिकणाऱ्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी विद्यार्थ्याने शाळेच्या मधल्या सुट्टीत हल्ला केला.
दहावीचा विद्यार्थी शाळेतच रक्ताच्या थारोळ्यात पडला. हा प्रकार घडताच शाळेच्या शिक्षकांनी जखमी विद्यार्थ्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, संबंधित विद्यार्थ्याला डॉक्टरांनी तपासल्यानंतर मृत घोषित केले.
मोहम्मद मुस्तकीम असे हत्या झालेल्या मुलाचे नाव आहे. तो अहिल्यानगर येथील मध्यवस्तीत असलेल्या सीताराम सारडा विद्यालयात इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होता. त्याचा एका आठवीच्या विद्यार्थ्यासोबत क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने थेट मुस्तकीम याच्यावर चाकुने हल्ला केला. आरोपी विद्यार्थ्याने मुस्तकीनच्या पाठीवर आणि हृदयाच्या जवळ चाकुने दोन वार केले.
हे वार वर्मी लागल्याने रक्ताच्या थारोळ्यात मुस्तकीन कोसळला. याची माहिती शिक्षकांना मिळाल्यानंतर शिक्षक अमोल कदम आणि सुनील कुलकर्णी यांनी घटनास्थळी धाव घेतली. शिक्षकांनी एका दुचाकीवरून मुलाला सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता, रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी विद्यार्थ्याला मृत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.
पोलीस उपअधीक्षक अमोल भारती यांनी सांगितले की, ‘क्रिकेट खेळण्यावरून बुधवारी आठवी आणि दहावीत शिकणाऱ्या मुलांमध्ये वाद झाला होता. हा वाद वाढल्यानंतर आठवीत शिकणाऱ्या मुलाने दहावीत शिकणाऱ्या मुलावर चाकुने वार केले. पाठीवर आणि हृदयाजवळ दोघ गंभीर घाव लागले. हा सगळा प्रकार शाळेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हल्ला झाल्यानंतर जखमी विद्यार्थ्याला सिव्हील रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी मुलाला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे.’
COMMENTS