मुंबई : पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान तणावावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परखड भाष्य केलं आहे. त...
मुंबई : पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या भारत-पाकिस्तान तणावावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परखड भाष्य केलं आहे. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, "अतिरेक्यांवर कारवाई गरजेची असली तरी युद्ध हा पर्याय नाही.
युद्धाने प्रश्न सुटत नाहीत."
मुंबई तक या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी विविध विषयांवर आपली ठाम भूमिका मांडली. ही मुलाखत सिनेदिग्दर्शक केदार शिंदे आणि पत्रकार यांच्या संयुक्त सहभागातून झाली.
राज ठाकरे म्हणाले, "आता जे काही झालं, त्याला युद्ध म्हणता येणार नाही. देशासमोर जी आव्हानं आहेत, ती आपण ओळखली पाहिजेत. मी पूर्वीही युद्धाच्या विरोधात बोललो होतो, तेव्हा लोक म्हणाले मी देशद्रोही आहे. पण आपल्याला आपल्या देशांतर्गत प्रश्नांवर आधी लक्ष द्यायला हवं."
त्यांनी माध्यमांकडून सादर होणाऱ्या 'युद्धपंती' वृत्तांकनावरही जोरदार टीका केली. "इस्लामाबाद घेतलं, कराची ताब्यात घेतलं, अशा बातम्या सुरू होत्या. पण त्याचा उपयोग काय? इथली भिवंडी, मालेगाव सांभाळता येत नाहीत, मग इस्लामाबाद घेऊन काय करणार?" असा उपरोधिक सवाल त्यांनी उपस्थित केला.
त्यांच्या मते, अतिरेक्यांवर कठोर कारवाई ही गरजेची आहेच, पण भावनात्मक निर्णयाऐवजी तर्कशुद्ध व स्थिर धोरण आखण्याची वेळ आली आहे. त्यांनी गाझापट्टीतील स्थितीचं उदाहरण देत सांगितलं की, युद्ध म्हणजे विनाश - आणि आपल्याला ते टाळणं आवश्यक आहे.
COMMENTS