राज्यातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण-गोव्यात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस पड...
राज्यातील वाढत्या तापमानामुळे पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाडा आणि कोकण-गोव्यात मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
त्यामुळे आठवडाभर वादळी पावसाचे वातावरण असले तरी त्यानंतर उन्हाच्या चटक्यासह उकाडा अधिक वाढणार आहे. दरम्यान, राज्यात मंगळवारी (दि. १८) ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४१.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
मागील आठवड्याभरात विदर्भात कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे नागपूर, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यातील उष्णतेचा पारा ४२ ते ४३ अंशापर्यंत पोहचला होता. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट आली असून, काही जिल्ह्यांना यलो तर काहींना उष्णतेचा आॅरेंज अलर्ट देण्यात आला होता. या वाढत्या तापमानामुळे विदर्भात दि. २१ ते २२ मार्चदरम्यान विदर्भातील भंडारा, वाशिम, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० एवढा असेल.
विदर्भासह मध्य महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील काही भागात आज (मंगळवारी) मेघगर्जनेसह पाऊस झाला. दि. १९ मार्च रोजी मराठवाड्यातील धुळे, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, परभणी तर दि. २० मार्चला परभणी हिंगोली नांदेड याठिकाणी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.
राज्यातील काही प्रमुख्य जिल्ह्यातील आजचे कमाल तापमान
ब्रह्मपुरी ४१.५, चंद्रपूर ४१.२, सोलापूर ४०.४, वाशिम ४०.२, अकोला ४०.१, वर्धा ४०, यवतमाळ ३९.६, अमरावती ३९.६ मालेगांव ३९.४, परभणी ३९.३, सातारा ३९.२, सांगली आणि नागपूर ३९, पुणे (लोहगांव) ४०.३, जळगाव ३८.२, बुलढाणा ३८.
COMMENTS