मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच घरगुती वीज ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी विधानसभेत बळी...
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच घरगुती वीज ग्राहकांसाठी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी विधानसभेत बळीराजा मोफत वीज योजनेचा लाभ ४५ लाख शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगितले.
तसेच १ कोटी ३४ लाख ग्राहकांना घरगुती वीज मोफत देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना आता ३६५ दिवस दिवसा वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी पिकांना पाणी सोडण्याची गरज भासणार नाही. महाराष्ट्र हे १६ हजार मेगावॅट कृषी वीज पुरवठा करणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. (CM Devendra Fadnavis announces free electricity for farmers)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, डिसेंबर २०२६ पर्यंत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना वीज सोलर पॅनेलच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यामुळे पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी होईल आणि पर्यावरणपूरक उपाययोजना शक्य होतील. तसेच, घरगुती ग्राहकांसाठी मोठी घोषणा करत 1 कोटी ३४ लाख ग्राहकांना मोफत वीज देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. विजेच्या किंमतीतील वाढ रोखण्यासाठी सरकारकडून अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. राज्यातील वीजपुरवठा सुधारण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला असून २०३० पर्यंत महाराष्ट्रातील ५२% वीज अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून तयार केली जाणार आहे. यात सौरऊर्जा, पवनऊर्जा आणि अन्य नवीकरणीय स्रोतांचा समावेश असणार आहे.
सर्व स्वयंचलित वाहनांसाठी अनिवार्य करण्यात आलेल्या एचएसआरपी नंबरप्लेटच्या किमती इतर राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याचा दावा करण्यात आला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "देशात सर्वात महाग एचएसआरपी नंबरप्लेट महाराष्ट्रात विकल्या जात आहेत, असा एचएसआरपी नंबरप्लेटबाबत एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला. खरंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे याची अंमलबजावणी आपल्याला आधीच करायची होती. दरम्यान, या एचएसआरपी नंबरप्लेटच्या अंमलबजावणीबाबत आपण मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. त्यांनी इतर सदस्यांसोबत मिळून या नंबर प्लेटबाबत जे काही दर आले होते. त्याचं मूल्यमापन करून अंतिम दर निश्चित केले आहेत."
"काही राज्यांनी फिटमेंट चार्जेस आणि प्लेट चार्जेस हे वेगवेगळे दाखवले आहेत. पण आपल्याकडे हे सर्व एकत्र केले आहे. विविध राज्यांमधील दुचाकींसाठीच्या एचएसआरपी नंबर प्लेटचे दर बघितले तर ते ४२० ते ४८० दरम्यान आहेत. महाराष्ट्रामध्ये हे दर ४५० रुपये आहेत. तर तीन चाकींसाठी सर्व राज्यांमध्ये ४५० ते ५५० रुपये दर आहे. तर महाराष्ट्रामध्ये हेच दर ५०० रुपये आहेत. चारचाकींसाठी सरासरी ८०० रुपये दर आहे. तर महाराष्ट्रामध्ये ते ७५० रुपये आहेत. जड वाहनांसाठी ६९० ते ८०० तर आपल्याकडे हा दर ७४५ रुपये आहे. पुरावा म्हणून मी मुद्दाम इतर राज्यांमधील पावत्या घेऊन आलो आहे," असे म्हणत सभागृहात त्यांनी पुरावेदेखील सादर केले.
COMMENTS