कलबुरगी दि. ३ (प्रतिनिधी- प्रा. तुकाराम मोरे) जागतिकिकरणाच्या युगात कोणत्याही भाषेतील साहित्याला जात, धर्म आणि प्रादेशिक सीमेमध्ये बंदिस्त...
कलबुरगी दि. ३ (प्रतिनिधी- प्रा. तुकाराम मोरे)
जागतिकिकरणाच्या युगात कोणत्याही भाषेतील साहित्याला जात, धर्म आणि प्रादेशिक सीमेमध्ये बंदिस्त करता येत नाहीं. कोणत्याही कारणावरून भाषा द्वेष करून भाषिक तणाव निर्माण करणे वैचारिकदृष्ट्या योग्य नाहीं असे प्रतिपादन आळंदचे आमदार, नीती व योजना आयोगाचे उपाध्यक्ष बी.आर.पाटील यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ मुंबई व कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुरगी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील आयडियल फाईन आर्ट गॅलरी सभागृहात मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित पुरस्कार प्रदान, पुस्तक प्रकाशन व बहुभाषिक कविसंमेलनाचे उदघान बी आर पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना बी.आर.पाटील म्हणाले की,सर्वांना अनेक भाषा बोलता यायला हवे मराठी व कन्नड भाषा स्वातंत्र्यपूर्व काळापासून गुण्यागोंदाने नांदत आहेत.असेही ते म्हणाले.
यावेळी प्रा.देविदास फुलारी यांचे 'रात्र भरात आहे' या काव्यसंग्रहाचे डॉ.संध्या राजन यांच्या 'इरुळू अरळीदे''कन्नड अनुवादीत काव्यसंग्रह बरोबरच संध्या राजन यांच्या काजव्यांची दिंडी व डॉ राजेंद्र पडतुरे यांच्या मातृ देवो भव पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी करामसापकडून डॉ.राजेंद्र पडतुरे पुरस्कृत " मराठी भाषा कायकरत्न पुरस्कार" मुंबईच्या जेष्ठ कवयित्री व साहित्यिक अनघा तांबोळी यांना आमदार बी.आर.पाटील यांच्या हस्ते शाल, म्हैसूर फेटा व गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
करामसापचे गौरवाध्यक्ष डॉ. दिनकर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास जेष्ठ साहित्यिक प्रा.आर.के.हुडगी, कसापचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार पाटील तेगलतिप्पी, संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ.राजेंद्र पडतुरे बेंगळुरू, आयडियल फाईन आर्ट सोसायटीचे कार्यवाह डॉ.व्ही.जी.अंदानी, डॉ. किशोर देऊळगांवकर, करामसापचे अध्यक्ष व अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे उपाध्यक्ष गुरय्या स्वामी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
प्रा.आर.के.हुडगी यांनी अलीकडे सीमाभागात होत असलेल्या गोंधळाबद्दल नाराजी व्यक्त करीत म्हणाले की, आपल्या मातृभाषेचा अभिमान असावा परंतु इतर भाषिकांचा द्वेष करता कामा नये असे स्पष्ट करून कर्नाटकात आणि महाराष्ट्रात बसवर दगड मारणारे अथवा कंडक्टर, ड्रायव्हर यांच्या तोंडाला काळे फासणारे भाषा प्रेमी नाहींत. त्यांना भाषेचा मुळीच अभिमान नसतो समाज जीवनाचा अभ्यास नसलेल्या संस्था आंतरिक उद्देशामुळे असे कृत्य करीत आहेत त्याचा निषेध करायला हवे.
मराठी व कन्नडमध्ये अनेक श्रेष्ठ साहित्यिक व विचारवंत असून त्यांच्या विचारांचे सतत आदानप्रदान होत असते तेव्हा भाषा द्वेष करणे चुकीचे आहे.
सत्काराला उत्तर देताना अनघा तांबोळी म्हणाल्या की, महाराष्ट्र ही माझी मायभूमी तर कर्नाटक ही कर्मभूमी असून कर्नाटकातील श्रेष्ठ साहित्यिक डॉ. द.रा.बेंद्रे , एस.एल.भैरप्पा, शिवराम कारंत माझे दैवत असून माझी मुले मराठी व कन्नड या दोन्ही भाषा अत्यंत निखळपणे बोलतात.
डॉ. राजेंद्र पडतुरे, जेष्ठ लेखिका व अनुवादक डॉ. संध्या राजन अणवेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. दिनकर मोरे यांनी,आजकाल लिहिणारे,वाचणारे कमी होत चालले असून मातृभाषा व संस्कृती टिकवण्यासाठी वाचन चळवळ सुरू करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रारंभी कन्नड नाडगीतानंतर प्रा. सोनिका आळंदकर यांनीस्वागत गीत सादर करत कार्यक्रमाचे सुत्रसंचलन केले तर सौ.सुखदा शहा यांनी सत्कारमूर्तींचा परीचय करुन दिला. करामसापचे कार्यवाह प्रभाकर सलगरे यांनी उपस्थितांचे परीचयात्मक स्वागत केले.
गुरय्या स्वामी यांनी प्रास्ताविकात करामसापच्या स्थापनेपासून आजपर्यंतच्या विविधांगी कार्याचा आढावा घेत परीषदेला वेळोवेळी सहयोग देणा-यांबध्दल नामोल्लेख करत कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी एक लाख रुपये ठेवीसाठी करामसापकडे देऊन मराठी भाषा कल्याण रत्न पुरस्काराचे पुरस्कृत पद स्वीकारल्याबध्दल करामसापचे कोषाध्यक्ष मिलिंद उमाळकर यांचा त्यांची आई व पत्नी समवेत विशेष सत्कार करण्यात आला.
जेष्ठ साहित्यिक कवी बी.ए.कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व माझी मराठीचे संपादक प्रा. विजयकुमार चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बहुभाषिक कविसंमेलन पार पडले यामध्ये मराठी कन्नड हिंदी ऊर्दू व तूळू भाषिक कविंनी उस्फुर्त सहभाग घेतला.
कविसंमेलनात डॉ. देविदास फुलारी व महेश मोरे नांदेड, मारुती तरसे विजयपूर, सौ. सुधा बेटगेरी बागलकोट, आनंद जाधव बसवकल्याण, कलबुरगी दूरदर्शनचे निवृत्त संचालक सदानंद पेर्ला, जेष्ठ पत्रकार संगमनाथ रेवतगांव, जेष्ठ कवि गोविंद कुलकर्णी, सुनील चौधरी, डॉ. विलास साळुंखे, सुरेखा स्वामी, डॉ.अविनाश देवनूर सह सुमारे ३८ कविंनी सहभाग नोंदवला.प्राचार्य शेषेराव बिराजदार राहुल जावळे यांनी बहुमूल्य योगदान दिले.
COMMENTS