पुणे : हिंजवडी टेम्पो जळीतकांड घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून पुढे ...
पुणे : हिंजवडी टेम्पो जळीतकांड घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर आली असून, हा अपघात नसून घातपात असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासणीतून पुढे आले आहे. ड्रायव्हरनेच टेम्पो जाळल्याची माहिती समोर आली आहे.
पुणे शहरातील हिंजवडी परिसरामध्ये एका कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला अचानक भीषण आग लागल्याची घटना बुधवारी (ता. 20) सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेमध्ये कंपनीतील 4 कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला, तर टेम्पो ट्रॅव्हल्स देखील जळून खाक झाली आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 14 कर्मचारी या टेम्पोमध्ये प्रवास करत होते. सुदैवाने 10 प्रवासी बचावले आहेत.
हिंजवडी फेज वनमध्ये परिसरात कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागली. या घटनेत चालकाच्या पायाखाली अचानक आग लागल्याने चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्याने ट्रॅव्हल्समधील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मात्र, हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. ट्रॅव्हल्सला आग लागली नाही तर चालकानेच गाडी पेटवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे, चौघांचा जीव घेतल्याप्रकरणी आणि 5 जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांडाचा उलगडा झाला असून गाडीचा चालक जनार्दन हंबर्डेकर याने घातपात रचून, आपल्याच कंपनीतून केमिकल आणून त्याच्या ड्रायव्हर सीटखाली ठेवले होते. तसेच, कापडाच्या चिंध्याही ठेवल्या होता. त्यानुसार, प्लॅन करुन त्याने टेम्पोचा स्फोट घडवून आणला आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवडचे डीसीपी विशाल गायकवाड यांनी दिली. टेम्पोचालकाचा कंपनीतील कर्मचाऱ्यांशी वाद होता. त्याचा पगारही त्याला मिळालेला नव्हता, त्याला ड्रायव्हर व्यतिरिक्त इतर मजुरीची कामे दिली जात होती. त्यातून, त्याचा 4 ते 5 जणांवर राग होता, अशी माहिती गायकवाड यांनी दिली.
दरम्यान, गाडीच्या जळालेल्या लोखंडावर ओरखडे होते. ते शेवटच्या क्षणापर्यंत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. कोणीतरी त्या बंद दरवाज्याला ओरबाडून उघडायचा प्रयत्न केला होता. जीवाच्या अकांताने ते दार उघडण्याचा प्रयत्न करत असतील. पण तो दरवाजा उघडला नाही. फुटलेल्या काचांवरही असेच निशाण होते. ते शेवटपर्यंत झगडले होते. या घटनेनंतर त्या जळालेल्या बसच्या कोपऱ्यामध्ये जेवणाचे डबे, जळालेल्या चपला दिसत होत्या. या बसमधील जळालेल्या सीटचा कोळसा झाला आहे. गाडीच्या आतील धातू देखील वितळला आहे.
COMMENTS