मुंबई : राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले असून यामध्ये उपयुक्त विषयांवर चर्चा न झाल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर विरोधक सभागृहाम...
मुंबई : राज्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन संपले असून यामध्ये उपयुक्त विषयांवर चर्चा न झाल्याची टीका विरोधकांनी केली आहे. तर विरोधक सभागृहामध्ये कमी आणि पायऱ्यांवर जास्त असल्याचा टोला सत्ताधाऱ्यांनी लगावला आहे. दरम्यान, राज्यात दिशा सालियान हे प्रकरण चर्चेत आहे. पाच वर्षापूर्वी मृत्यू झालेल्या दिशा सालियानच्या मृत्यूचे गूढ अद्याप उलघडलेले नाही. या प्रकरणामध्ये दिशाचे वडील सतीश सालियान यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार होऊन तिची हत्या केल्याचा धक्कादायक दावा केला होता.
याबाबत त्यांनी मुंबई हाय कोर्टामध्ये याचिका दाखल केल्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. यामध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील सत्ताधारी आरोप करत आहेत.
मात्र दिशा सालियान हिच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सतीश सालियान यांनी राजकारण करु नये, असे मत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
सौगात-ए-मोदी हे भाजपचं एक ढोंग
खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य केले आहे. ईदच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सौगात-ए-ईद दिली जाणार आहे. यावर राऊतांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, “निवडणुकीच्या प्रचारामध्ये देशातील मुस्लीम बांधवांबाबत आपण काय नाही बोललात? मोदींनी त्यांच्या लोकांची भाषणे पुन्हा एकदा ऐकली पाहिजेत. हे घुसखोर लोक आहेत..हे मंगळसूत्र चोरणारे आहेत अशी टीका केली. मात्र आता सौगात-ए-मोदी हा उपक्रम भाजपचं एक ढोंग आहे,” असा घणाघात खासदार राऊत यांनी केला.
पुढे खासदार राऊत यांनी दिशा सालियान प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “पोस्टमार्टम रिपोर्ट आलेला आहे. तो तर आम्ही काढलेला नाही ना. त्यामुळे तिच्या वडिलांनी राजकारण करु नये. आमच्यासाठी हे प्रकरण बंद झाले आहे. आपल्या मुलीच्या मृत्यूचे राजकारण त्यांनी करु नये. जे खरं आहे तेच समोर आहे. दिशा सालियान हिच्या घरी काही अडचण होती का? त्यांच्याकडे पैशांची चणचण होती का? याबाबत आम्हाला माहिती नाही. हा त्यांचा कौटुंबिक आणि वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर आम्हाला राजकारण करायचं नाही,” असे स्पष्ट मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे.
त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत
खासदार संजय राऊत म्हणाले की, “जे आता तिच्या मृत्यूच्या पाच वर्षानंतर तिच्या वडिलांना हाताशी धरुन राजकारण करत आहेत ते त्यांना लखलाभ होवो. पोस्टमार्टम रिपोर्ट काही दिवसांपूर्वी आला आहे. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे समर्थ आहेत. अशा घाणेरड्या विषयांचं राजकारण करुन जे या महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकाच्या ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करु इच्छितात आणि पुन्हा बाळासाहेब ठाकरेंचे फोटो लावतात. आम्ही बाळासाहेबांचे विचारवाहक असल्याचे म्हणतात. अशा खाणेरड्या प्रकरणाचं राजकारण करताना त्यांना लाजा वाटल्या पाहिजेत हे करताना,” असा टोला खासदार संजय राऊतांनी लगावला आहे.
COMMENTS