म्यानमार : म्यानमारमध्ये आज सकाळी जोरदार भूकंपाचे हादरे बसले असून, याची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचे परिण...
म्यानमार : म्यानमारमध्ये आज सकाळी जोरदार भूकंपाचे हादरे बसले असून, याची तीव्रता ७.७ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपाचे परिणाम म्यानमारपुरतेच मर्यादित न राहता थायलंड, बँकॉक, भारतासह अनेक शेजारी देशांमध्ये जाणवले, त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या भूकंपानंतर सोशल मीडियावर अनेक भीषण व्हिडीओ व्हायरल होत असून, यामध्ये बँकॉकमधील एक गगनचुंबी इमारत बांधकामादरम्यान कोसळतानाचा थरारक प्रसंग दिसतो आहे. लॅम्पपोस्ट जोरजोरात हलताना, रस्त्यांवर धावपळ करताना नागरिक आणि उंच इमारती कोसळताना अनेक व्हिडीओ समोर आले आहेत.
इमारत कोसळून ४३ जण अडकल्याची शक्यता : .
मिळालेल्या माहितीनुसार, बँकॉकमध्ये कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ४३ लोक अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बँकॉकमध्ये ही इमारत अजून बांधकामाधीन होती आणि अचानक झालेल्या भूकंपामुळे ती काही क्षणांत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली.एका व्हिडीओमध्ये उंच इमारतीच्या टेरेसवर असलेल्या स्विमिंग पूलमधील पाणी हादऱ्यांमुळे खाली कोसळताना स्पष्टपणे दिसते. या दृश्यांनी संपूर्ण परिसरात एकच घबराट उडवून दिली आहे. रस्त्यावरून जात असलेल्या प्रवाशांच्या मोबाइल कॅमेऱ्यात हा संपूर्ण क्षण कैद झाला आणि तो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
म्यानमारमधील Ava शहराचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून काही ऐतिहासिक रचना कोसळल्याची माहिती मिळत आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे हे धक्के ११:५० वाजता १० किलोमीटर खोलीवर जाणवले.आतापर्यंत या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त अधिकृतरीत्या समोर आलेले नाही, मात्र स्थानिक प्रशासन सतर्क असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. बँकॉकमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले जात आहे.
COMMENTS