विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर जीएमआरटी खोडद येथे मागील २१ वर्षांपासून राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्र...
विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जीएमआरटी खोडद येथे मागील २१ वर्षांपासून राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते. या वर्षी दिनांक २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी हे प्रदर्शन आयोजित केलेले होते. या वर्षीच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये २२० पेक्षा जास्त प्रकल्प सादर करण्यात आले त्यामध्ये श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील कु. सूर्याजा माने या विद्यार्थिनीने ११वी, १२वी, आय. टी. आय. आणि डिप्लोमा या गटामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.
या बाबतची सविस्तर माहिती अशी कि दरवर्षी एनसीआरए, पुणे आणि जीएमआरटी खोडद यांच्या संयुक्त विद्यमाने जुन्नर, पुणे येथे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील विज्ञान प्रदर्शन आयोजित केले जाते. या प्रदर्शनामध्ये भारतातून विविध ठिकाणाहून शाळा व कॉलेजमधून अनेक प्रकल्प सादर होत असतात ज्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, जुनिअर व सीनियर कॉलेज, तसेच आय. टी. आय., डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर आणि ईन्जिनिअरिंगचे विद्यार्थी भाग घेतात. यावर्षीच्या प्रदर्शनामध्ये जवळपास ५०० विद्यार्थ्यांनी २२० प्रकल्प सादर केले आणि जवळजवळ २०,००० लोकांनी या प्रदर्शनास भेट दिली.
यावर्षीच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये श्री शिव छत्रपती महाविद्यालयातील कु. सूर्याजा माने या विद्यार्थिनीने “डेव्हलपमेंट ऑफ नॉव्हेल बायोमटेरिअल बेस्ड हायड्रोजेल फॉर प्रोटेक्शन ऑफ एस्ट्रोनॉट्स फ्रॉम हॅझार्डस् सोलार रेडीएशनस्” हा प्रकल्प सादर केला होता. या प्रकल्पामध्ये पश्चिम घाटात आढळणाऱ्या कोळ्याने विणलेल्या जाळ्याचा वापर करून अंतराळवीरांच्या सूट मध्ये वापरण्यासाठी एक आवरण तयार केले आहे. याबाबत या विद्यार्थिनीचे मार्गदर्शक प्रा. डॉ. रविंद्र चौधरी व डॉ. प्रमोद माने यांनी सांगितले कि या कोळ्याने विणलेल्या जाळ्यामधील एका विशिष्ठ प्रथिनामध्ये अंतराळातील सोलार रेडीएशनस् रोखण्याची क्षमता आहे आणि याच गुणधर्माचा उपयोग करून आम्ही एक आवरण तयार केले.
यावर अधिक बोलताना कु. सूर्यजा माने या विद्यार्थिनीने सांगितले कि आम्ही कोळ्याने विणलेल्या जाळ्यावर मागील दोन वर्षांपासून काम करत होतो मात्र याचा उपयोग अंतराळवीरांसाठी करू शकतो ही कल्पना मला सुमारे तीन महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अडकून पडलेल्या सुनीता विल्यम्स यांच्या शरीरावर होत असलेल्या हानिकारक परिणामाची माहिती नासाने प्रसारित केल्यानंतर सुचली आणि मी याच धर्तीवर प्रेरित झाले आणि प्रा. डॉ. रविंद्र चौधरी व डॉ. प्रमोद माने यांच्या मार्गदर्शनाखाली या विषयावर काम करण्यास सुरुवात केली.
डॉ. प्रमोद माने यांनी पुढे असे सांगितले कि, या आवरणावर अतिनील किरणांचा तसेच उच्च तापमानाचा काहीही विपरीत परिणाम होत नाही तसेच हे एक बायोमटेरिअल असल्यामुळे याचा मानवाच्या शरीरावर किंवा मानवी शरीरातील पेशींवर, हाडांवर कोणताही दुष्परिणाम होत नाही.
या यशाबद्दल ॲड. संजय काळे, अध्यक्ष, जुन्नर तालुका शिवनेर शिक्षण प्रसारक मंडळ, जुन्नर, अध्यक्ष प्रतिनिधी प्रा. व्हि. बि. कुलकर्णी, प्राचार्य डॉ. एम. बी. वाघमारे, तसेच कनिष्ठ महाविद्यालय समन्वयक प्रा. प्रतिभा लोढा मॅडम आणि प्रा. श्रीमंते सर यांनी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले.
COMMENTS