नागपूर : छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. औरंगजेब...
नागपूर : छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्यावरुन गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. औरंगजेबाच्या कबरीचा वाद राज्यभर गाजत असून, त्याच पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी नागपूरमध्ये दोन गटांमध्ये मोठा राडा झाला.
दगडफेक, वाहनांची तोडफोड आणि अनेक वाहने जाळली गेली. यामुळे महाल भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याचप्रकरणी एक मोठी उपडेट समोर आलीये. नागपूरमधील या हिंसाचाराच्या मागे कोण आहे, याबद्दलची माहिती समोर आली आहे.
कोण आहे तो?
नागपूरमधल्या हिंसाचारामागे फहीम शमीम खान हा मास्टरमाईंड असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हिंसाचारानंतर पहिल्यांदाच कोणाचं तरी नाव असं स्पष्टपणे घेण्यात आलं आहे. फहीम शमीम खान हा मायनोरीटीस डेमोक्रेटिक पक्षाचा तो शहर अध्यक्ष आहे. एफआयआरमध्ये फहीम शमीम खानचं नाव होतं, असं वकील आसिफ कुरेशी यांनी टीव्ही ९ ला सांगितलं आहे. तसेच, फहीम खानला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती सुद्धा देण्यात आली आहे. फहीम खान याने लोकांना भडकवण्याचे काम केले आणि त्यानंतर ही हिंसा घडली. नागपूरमधील गणेशपेठ पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या तक्रारीमध्ये हे उघड झाले आहे.
तक्रारीत नेमकं काय म्हंटलं आहे?
तक्रारीनुसार, जमावाने अंधाराचा फायदा घेत महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गांधी गेटजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शने केली. औरंगजेबाच्या थडग्याविरुद्ध घोषणाबाजी करण्यात आली.
यासोबतच, औरंगजेबाचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी, मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) शहराध्यक्ष फहीम खान यांच्या नेतृत्वाखाली पोलिस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी, लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी आणि धार्मिक शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या उद्देशाने जमावाने कुऱ्हाडी, दगड, काठ्या आणि इतर धोकादायक शस्त्रांचा वापर केला.
COMMENTS