विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर जुन्नर तालुक्यातील पहिला आणि पुणे जिल्ह्यातील पहिला आदिवासी युवक म्हणून माउंट किलीमांजारो (५८९५ मी.) ...
विशेष प्रतिनिधी : प्रा. निलेश आमले सर
जुन्नर तालुक्यातील पहिला आणि पुणे जिल्ह्यातील पहिला आदिवासी युवक म्हणून माउंट किलीमांजारो (५८९५ मी.) शिखर सर करण्याचा मान निखिल किसन कोकाटे यांनी मिळवला आहे. त्यांनी १९ फेब्रुवारी, शिवजयंती या शुभ दिनी हा ऐतिहासिक पराक्रम गाजवला. प्रवासाचा सुरुवात: १२ फेब्रुवारी रोजी मुंबई विमानतळावरून निघाल्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करत किलीमांजारो आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. स्थानिक टूर कंपनीशी संपर्क साधून आवश्यक प्रक्रियेनंतर वातावरण जुळवून घेण्यासाठी मतेरानी धबधबा आणि कॉफी टूर केली.
साहसाच्या दिशेने पहिले पाऊल:
१४ फेब्रुवारीपासून ७ दिवसांचा ट्रेक सुरू झाला. यात कॅनडा, स्लोव्हेनिया, फ्रान्स, हाँगकाँग आणि इंग्लंड, रशिया येथील गिर्यारोहक सहभागी होते. स्थानिक पारंपरिक पोशाखात सन्मानित करून ट्रेकचा शुभारंभ झाला. मचामे गेटपासून ट्रेक सुरू झाला आणि मवेका गेटपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाला.
शारीरिक व मानसिक संघर्ष:
प्रत्येक टप्प्यावर कठीण परिस्थितीचा सामना करत, अत्यंत थंड हवामान, उंचीतील कमी ऑक्सिजन, डोंगराळ भागातील अवघड वाटा यावर मात करत प्रवास सुरू राहिला. शिवछत्रपतींच्या प्रेरणेमुळे प्रत्येक खडतर टप्पा पार करत पुढे जात राहिलो.
शिखरावर यशस्वी पाऊल!
१८ फेब्रुवारीच्या रात्री ११ वाजता चढाईस सुरुवात केली. तब्बल ६ तासांच्या कठीण चढाईनंतर, ५७८० मी. उंचीवरील स्टेला पॉइंट गाठल्यावर आत्मविश्वास वाढला. शेवटच्या टप्प्यात संपूर्ण जिद्दीने पुढे जात १९ फेब्रुवारीच्या सकाळी 'आफ्रिकेच्या सर्वोच्च शिखरावर' पोहोचलो. हीच शिवजयंतीची खरी प्रेरणा!
गौरवशाली पराक्रम:
हा केवळ वैयक्तिक विजय नसून, जुन्नरच्या आदिवासी युवकांसाठी प्रेरणादायी पाऊल आहे. *पुणे जिल्ह्यातील पहिलाच आदिवासी गिर्यारोहक म्हणून किलीमांजारो सर केल्याचा अभिमान आहे.* हा सात पर्वतांवरील (Seven Summits) पहिला टप्पा असून, आगामी पर्वत मोहिमा लवकरच सुरू होणार आहेत.
या यशासाठी आदिवासी विकास विभागाचे व अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार. या प्रवासात मदत करणाऱ्या प्रत्येकाचे निखिलच्या वतीने मनःपूर्वक आभार!
COMMENTS